कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; खरीप हंगाम धोक्यात
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सततच्या जोरदार पावसामुळे शेतीपिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम काढणे धोक्यात आले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटले आहेत.
जिल्ह्यात पाच महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. विशेषतः गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा या डोंगरपायथ्याच्या तालुक्यांत मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पंचगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, कासारी या नद्यांच्या काठावरील शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने भात, मका, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ऊसपिक सुद्धा कोसळून पडले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 30 हजार हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला असून, यातील मोठा वाटा भात पिकाचा आहे.
हेदेखील वाचा : राज्यात पुन्हा दमदार पाऊस होणार; पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
डोंगराळ भागात पिकांचे खोडच उखडून गेले आहे तर खालच्या पट्ट्यातील शेती पूर्णतः पाण्याखाली राहिली आहे. सातत्याने आकाश ढगाळ असल्याने शेतकऱ्यांना औषधफवारणी, तणनाशके किंवा कीड नियंत्रण करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे उत्पादनावर आणखीन परिणाम झाला आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते वाहून गेले, बंधारे तुटले आणि काही ठिकाणी शेततळी फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सिंचनाच्या सोयी विस्कळीत झाल्या असून पुढील हंगामातील नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी केलेली खर्चिक गुंतवणूक वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व हतबलता दिसून येत आहे. बियाणे, खते, औषधे घेऊन पेरणी केली होती. आता सगळे पिक पाण्यात गेले. कर्ज कसे फेडायचे, घरखर्च कसा भागवायचा, याची काळजी लागली आहे, असे म्हणत अनेक शेतकरी डोळ्यांत अश्रू आणून परिस्थिती मांडत आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा सुरू केला असून, मदतीसाठी अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत मिळायला उशीर होत असल्याने शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्यांना तातडीने बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, कर्जमाफी जाहीर करावी आणि विमा दावे लवकर दिले जावेत, अशा मागण्या करत आहेत.
पुढील काही दिवस पावसाचा इशारा
हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने खरीप हंगामाचे नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे. जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून, संपूर्ण जिल्हा प्रशासन व कृषी विभागासाठी खरी कसोटीची वेळ आली आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी तातडीचे निर्णय व मदतीची पावले न उचलल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.