Heavy Rain
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली. अनेक भागात पुलावर, रस्त्यावर व गल्लीबोळात पाणी साचल्याने जनतेला कसरत करावी लागत आहे. अनेक भागात रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
हेदेखील वाचा : नांदेड जिल्ह्यात आभाळ कोसळले, दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान
तालुक्यात मुसळधार पावसामुळे टाकळी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक बंद झाली होती. चाटवण, टाकळी, अर्जकवाकडा, सत्पल्ली, दाभा, दिग्रस, दुर्भा या गावातील व इतर गावातील शेती पाण्याखाली गेली आहे. कपाशीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व जवळपास सर्वच लागवडीचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
शेतातील बांध, कालवे फुटून शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघून प्रशासनाने शेतीचे पंचनामे करून तत्काळ मदत करावी, अशी मागणी माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बुर्रेवार, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश येल्टीवार व अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस
अमरावतीसह पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात बुधवारी (दि. 4) सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भात बरेच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान विदर्भात बरेच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली.
सण-उत्सवाच्या काळात हजेरी
ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. तर, सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या काळात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.