कराड : शहरातील बुधवार पेठ परिसरात बुधवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास एका घरात घरगुती गॅस सिलेंडरला गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटात शेजारच्या घरातील नागरिक मिळून सहा जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. जखमींच्यावर येतील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुधवार पेठ परिसरातील प्रभात चित्र मंदिराजवळच्या गल्लीत गॅस गळती होऊन बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास स्फोट झाला. मोठ्या आवाजाने परिसर हादरला . अनेक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेत किरण बडेकर (वय ५०), अनिता मोरे (वय ५८), संगीता भोसले (वय ५०), मालन भोसले (वय ४०), अमोल भोसले (वय ३२), उमेश दुबळे (वय ३५ सर्व राहणार बुधवार पेठ कराड) हे सहा जण जखमी झाले. जखमींवर तातडीने वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, कराड नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी बोलवण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी व स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी सहकार्य केले केले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती.