इंदापूर : सत्तापालटाच्या घडामोडी घडल्यानंतर एखादे नवीन स्वातंत्र्ययुद्ध सुरु व्हावे, असे आत्ताचे राजकीय वातावरण झालेले आहे. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रचंड सहानुभूती वाटत आहे. शिवसेनेत येण्यास इच्छुकांचे फोन मोठ्या प्रमाणात येत आहेत. बुद्धिवादी, कामगार, पुढारी, प्राध्यापक, दलित चळवळीतील लोकांचा त्यामध्ये समावेश आहे.
सुषमा अंधारेंसारखे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर भागातील दीपक खरात यांच्यासारखे प्राथमिक शिक्षक राजीनामा देऊन शिवसेनेचे पूर्णवेळ काम करायला निघाले आहेत. जे आत्तापर्यंत शिवसेनेचे चाहते होते, ते अनुयायी होऊ लागलेले आहेत. हे चित्र पाहता पुढची राजकीय परिस्थिती अत्यंत संमिश्र असणार आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी शनिवारी (दि.३०) येथे व्यक्त केले.
पंढरपूरकडे जाताना त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राजकारणात सर्वात महत्वाची असते ती विश्वासार्हता. अनेकजण विचारतात की, उद्धव ठाकरे यांची काय चूक झाली. ते सर्वांवरच विश्वास टाकत होते. ही चूक म्हणता येणार नाही. चांगली माणसं जशी सुसंस्कृत वागतात, तसेच आपण वागायचे आहे. संशय आहे म्हणून प्रत्येकावर ‘वॉच’ हे आमच्या कोणत्याही नियमात बसत नाही. अशाप्रकारचे वर्तन कुणी आमदार करतील अशी कल्पना ही आपण कधी केली नव्हती.
निहार ठाकरेंचा विषय छोटा
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व आपले चांगले संबंध होते, असे सांगून ‘तुझे आहे, तुझपाशी परी तू जागा चुकलासी’ अशी प्रतिक्रिया डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पाठिंब्यासंदर्भात ‘आपण काहीच प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. आपल्या दृष्टीने हा विषय फार छोटा आहे’ असे सांगून त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.