पुण्यात युवासेनेत इनकमिंग सुरूच; शेकडो कार्यकर्त्यांनी निलम गोऱ्हेंच्या उपस्थितीत केला प्रवेश
पुणे : आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेना- युवासेनेने पुण्यात पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. पुणे जिल्ह्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला आहे. अनिकेत जावळकरांनी युवासेनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक कार्यकर्ते युवासेनेत प्रवेश करत आहेत.
युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक अनिकेत जावळकर व पुणे युवासेना महानगरप्रमुख राजेश पळसकर यांच्या पुढाकारांने कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला आहे. विधान परिषद ऊपसभापती निलम गोऱ्हे व पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला आहे.
तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना फुटून दोन भाग झाले. ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटांत सातत्याने आरोप-प्रत्यारोप, वर्चस्वाचे राजकारण सुरू असतं. 40 पेक्षा जास्त आमदार घेऊन शिंदे बाहेर पडले, आणि भाजपच्या साथीला जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर ते जवळपास अडीच वर्षं, राज्याचे मुख्यमंत्री देखील होते. तेव्हापासूनच शिंदेंची पॉवर हळूहळू वाढू लागली असून दिवसेंदिवस ते स्ट्राँग होत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळं राज्यातील काही भागात ठाकरेंची ताकद कमी होताना दिसत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देखील रायगडमध्ये धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा कल वाढलेला दिसत आहे.