कोल्हापूर: महाराष्ट्रात रविवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राज्यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर उद्भवलेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीत आता नवनव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु झालीये. राज्यात अनेक भाजप आणि शिंदे गटाचे नेते नाराज असल्याच दिसून येत आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासोबत कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी देखील शपथ घेतल्याने नाराज झालेले भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी अखेर आज कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या सरकारमधील सहभागाने शिंदे गटातील अनेक नेते नाराज झाले आहेत. तर भाजपामध्ये देखील खद्खद सुरु आहे. काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आज समरजीत घाटगे यांनी शक्तीप्रदर्शन करत मोठी घोषणा केली आहे.
हसन मुश्रीफांच्याच कागल मतदारसंघातून निवडणूक लढवणार
दरम्यान, बोलताना घाटगे म्हणाले की, मागील दोन तीन दिवसांपासून मला कार्यकर्ते, पत्रकार फोन करताहेत. पण मी फोन उचलून काय सांगू म्हणून मी फोन उचलला नाही, याबददल मी तुमची माफी मागतो. पण काय बोलावे हा प्रश्न माझ्यासमोर होता, असं घाटगे म्हणाले. तसेच आम्ही ज्यांच्याशी संघर्ष केला तेच आज सत्तेत आहेत. माझ्याप्रमाणे अनेक कार्यकर्ते व नेते नाराज आहेत. दरम्यान, ज्याची सर्वांन प्रतिक्षा होती, ती आपण आज जाहिर करत आहोत, म्हणजे आपण कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा समरजीत घाटगे यांनी केली.
फडणवीसांच्या भेटीत काय
मी नाराज असल्याचं फडणवीसांना कळताच, त्यांनी मला फोन केला आणि भेटायला या, असं सांगितले. काल देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढत नाराजी दूर केली आहे. तुम्ही तुमचे विधानसभेच्या अनुषंगाने काम सुरू ठेवा कोणी आडवे आले तर आपण परतवून लावू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. असं सुदधा समरजीत घाटगे म्हणाले.