सांगली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मजबूत आहे, त्याला कोणीही हलवू शकत नाही. तीन पक्ष मिळून चांगले काम करत आहोत. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा संदेश दिला आहे, न घाबरता काम करा. भाजपा युती सरकार गुजरातच्या इशाऱ्यावर काम करत आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमानी मोदींकडे गहाण ठेवू नका. लोकसभेप्रमाणेच भरघोस पाठिंबा देत विधानसभेला मविआचे सरकार आणा, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे. तसेचं आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ, असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे लोकार्पण व पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील वांगी येथे झाला, या कार्यक्रमात खर्गे बोलत होते.
लाडक्या बहिणींना 2 हजार रुपये देणार
आमचं सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी तुम्हाला 2 हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का, मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केल ते सांगा, महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपच सरकार जाईल, असेही खर्गे यांनी म्हटले. यावेळी, राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेतील पात्र महिलांना 2000 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलंय.
खर्गे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श, प्रेरणास्रोत आहेत पण नरेंद्र मोदींचा हात त्यांच्या पुतळ्याला लागताच पुतळा कोसळला. मोदींनी गुजरातमध्ये पुलाचे उद्घाटन केले तो पडला, अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले, त्याला गळती लागली. नरेंद्र मोदी हे मतांसाठी दिखाव्याचे काम करतात. घाईघाईत पुतळा बनवल्याने तो कोसळला व महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान झाला.
खरी शिवसेना आमच्यासोबत – खर्गे
राम सुतार यांनी मूर्ती बनवल्या त्या 50 वर्षांपासून आहेत, मात्र आरएसएस बनवतात ते पडत आहेत. शाळेतील अभ्यासक्रम बदलत आहेत, संविधान बदलत आहेत, आणखी २० जागा मिळाल्या असत्या तर मोदी सरकार दिसलं नसतं, असेही खर्गे यांनी सांगलीतील सभेत म्हटले. तसेच, खरी शिवसेना आमच्या सोबत आहे, खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे, त्यांच्या बाजून सर्व नकली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत लक्षात ठेवा, खर स्वातंत्र्य हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आणि नेहरु यांच्या दुरदृष्टीने मिळालं होतं, असेही खर्गे यांनी म्हटलं.