देहूरोड : राहत्या घराच्या पार्किंग लगत पत्र्याच्या शेडमध्ये गाईंची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याच्या धंद्याचा देहूरोड पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी ( दि. २३) सकाळी सव्वा आठच्या सुमारास साईनगर, मामुर्डी येथे ही कारवाई करण्यात आली.
अनिस शेखलाल शेख, ( वय ४०, रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड), नदीम बशीर शेख ( वय- ३१), शाहरुख आरिफ कुरेशी ( वय-२५, दोघे रा. रा. दत्त मंदिर, आंबेडकर रोड, देहूरोड) आणि अंकुश मारुती आमले ( वय-५०, रा. राजीव गांधी नगर, देहूरोड), अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार निशांत वसंत ठोकळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अनिस शेख याच्या साईनगर, मामुर्डी येथील राहत्या घराच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये शेख आणि अन्य आरोपी गाईंची कत्तल करून ते मांस रिक्षात भरून विक्री करण्यासाठी नेताना आढळून आला. तसेच त्या ठिकाणी अन्य दोन गाईंची कत्तलीसाठी तयारी केल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाहून आरोपी शेख आणि अन्य तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या चारही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. आर. अतिग्रे करीत आहे.
-बजरंग दल, मनसेकडून कारवाईचे स्वागत
दरम्यान, देहूरोड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे बजरंग दल, मनसेकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Web Title: Illegal slaughterhouse exposed vigorous action by devu road police nrab