Maharashtra Rain News: विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू; कोकणातील 'या' जिल्ह्यात तर...
मुंबई: दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू झाली आहे. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात आज जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तर आज हवामान विभागाने राज्यातील कोणती जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.
अमरावती जिल्ह्यात शेतीचे नुकसान
अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. धामणगाव तालुक्यातील अंजनसि्गी गावामध्ये कालपासुन पावसाने हजेरी लावली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. आगळगाव ते उंबरगे गावादरम्यान एसटी अडकून पडली आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व अन्य कामांना जाणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
कोकणात धुमशान
पावसाने कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना झोपडून काढले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने सकाळपासून हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तसेच अरबी समुद्रात पश्चिमी वाऱ्यात वाढ झाल्याने पावसाची संततधार सुरू आहे. कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात नागरिकांनी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र भागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. पुणे जिल्ह्यात मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली.