पुणे : पुण्यातील हायप्रोफाईल अपघातप्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्त बदलण्याचा सल्ला डॉ. अजय तावरे यानेच बिल्डर विशाल अगरवाल याला दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यासोबतच डॉ. तावरे याला आणखी संपर्क साधला होता, याबाबत अद्याप समोर आलेली नसून, त्याबाबत तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.
कल्याणीनगर भागात घडलेल्या हायप्रोफाईल अपघात प्रकरणात पोलिसांकडून ससून रुग्णालयाच्या न्याय वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि प्रथम उपाचार विभागाचा डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक केली. गुन्हे शाखेकडून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. विशाल याने डेड हाऊसचा शिपाई अतुल घटकांबळे याच्याद्वारे डॉ. तावरे याच्याशी संपर्क साधला तसेच याबाबत मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर डॉ. तावरेनेच विशाल याला रक्त बदलण्याचा सल्ला दिला.
मद्यप्राशन केल्याचा अहवाल येणार नाही
रक्त बदलल्यानंतर मद्यप्राशन केल्याचा अहवाल येणार नाही. आणि पुढे केसला देखील फायदा होईल, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी रक्त त्या अल्पवयीन आरोपीचे घेतले. मात्र ते तपासणीसाठी न देता दुसऱ्याच व्यक्तीचे रक्त घेऊन ते अल्पवयीन मुलाच्या नावाने दिले. तत्पूर्वी डॉ. तावरेने विशाल याच्याशी सर्व बोलणे झाल्यानंतर लागलीच डॉ. श्रीहरी हाळनोर याला रक्त बदल व चाचणीची पुढची प्रक्रिया पार पडली. तसेच त्याबदल्यात शिपाई अतुल याच्यामार्फत ३ लाख रुपये घेतले.
ते रक्त कोणाचे हे गुलदस्त्यातच
डॉ. तावरे व डॉ. हाळनोर यांनी याप्रकरणात रक्त बदलले हे समोर आले असले तरी ते नेमके कोणाचे घेतले हे गुलदस्त्यातच आहे. त्याबाबत मात्र पोलिसांनी गुप्तता पाळली आहे. त्याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
ते पैसे नेमके कोणी दिले…
डॉ. हाळनोर याला तीन लाख रुपये मिळाले. ते पैसे जप्त करण्यात आले आहेत. डॉ. हाळनोर व शिपाई अतुल या दोघांकडून जप्त केली आहे. मात्र हे पैसे कोनामार्फत व कोणी दिले आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
खोटा रक्ताचा बनावट अहवाल
कल्याणीनगर अपघात प्रकरणात लाच स्वीकारून अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी व खोटा रक्ताचा बनावट अहवाल तयार केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि या तिघांविरोधात प्रिव्हेन्शन करप्शन ॲक्टनुसार कारवाई करण्यात येणार आहे. लाच स्विकारल्याने तिघांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहेत.