दीप्ती शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Women’s T20 bowling rankings : आयसीसीकडून ताजी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. महिला टी-२० क्रमवारीमध्ये भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला मोठा धक्का बसला आहे. दीप्ती शर्मा पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. दरम्यान, पाकिस्तानी डावखुरी फिरकी गोलंदाज सादिया इक्बालने शानदार कामगिरी करत टी-२० गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर उडी मारली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या टी-२० मालिकेत सादिया इक्बालने शानदार प्रदर्शन केले आहे. ३० वर्षीय या खेळाडूने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये एकूण पाच विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये एकाच डावात फक्त १८ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर सादिया इक्बालने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज अॅनाबेल सदरलँड आणि अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा यांना मागे टाकत दोन स्थानांची झेप घेतली.
सदरलँडने मागील महिन्यात फक्त नंबर १ रँकिंग मिळवले होते, परंतु इक्बालच्या सातत्यपूर्ण कामगिरी आणि सामना जिंकणाऱ्या गोलंदाजीमुळे ती आता पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. ताज्या रँकिंग अपडेटमध्ये पाकिस्तान संघासाठी आणखी चांगली बातमी समोर आली आहे.
मालिकेच्या शेवटच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी बजावल्यानंतर कर्णधार फातिमा सनाने अनेक श्रेणींमध्ये लक्षवेधक सुधारणा केली आहे. २४ वर्षीय ही खेळाडू टी-२० फलंदाजी क्रमवारीत ३१ स्थानांची झेप घेऊन २८ व्या स्थानी पोहचली आहे. तसेच महिला टी-२० क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत देखील ती पाच स्थानांनी पुढे सरकली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात फातिमा सनाने ४७ धावांची खेळी केली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला सामनावीर पुरस्कराने सन्मानीत करण्यात आले. मालिकेत सनाने ९०, ९ आणि ४७* धावा काढल्या आणि दोन विकेट्स चटकावल्या. त्यामुळे तिला मालिकावीर म्हणून देखील गौरवण्यात आले.
गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोनला एका स्थानाचा फायदा होऊन तिसऱ्या स्थानावर येऊन पोहोचली आहे. पाकिस्तानची नशरा संधू एका स्थानाने नवव्या स्थानावर आली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील पावसामुळे प्रभावित झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात अनेक भारतीय गोलंदाजांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याचे दिसत आहे. रेणुका सिंग सहा स्थानांनी पुढे सरकून पाचव्या स्थानावर विराजमान झाली आहे, तर अरुंधती रेड्डी १९ स्थानांचा फायदा होऊन ती १६ व्या स्थानावर आणि श्री चरणी आठ स्थानांनी पुढे सरकून ३९ व्या स्थानावर पोहोचल्या आहेत.






