इंदापूर : वर्षाच्या सुरूवातीलाच येणाऱ्या मकरसंक्रात सणाच्या मुहूर्तावर बाजारपेठ संक्रातीला लागणाऱ्या साहित्यांच्या दुकानाने गजबजल्याने इंदापूरच्या भाजी मंडईला आठवडेबाजाराचे स्वरूप आले आहे.
बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक झाल्याने भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. साखर आणि गुळाच्या दरात वाढ नसल्याने संक्रातीकरीता मागणी असणाऱ्या तीळगूळ, तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, गुळाच्या रेवढ्या आदी किंमतीमध्ये ही वाढ झाली नाही. त्यामुळे लोकांना परवडणाऱ्या किंमतीत त्या वस्तू मिळत आहेत.
सणाच्या अनुषंगाने बाजारात विविध पालेभाज्या, संक्रांतीचे खण, हळद-कुंकू, तीळगूळ, साखर रेवडी, सुपारी, खारीक, चुडा-पाटली, नाग वेलीची पाने आदी वस्तूंचे स्टॉल लागले आहेत.
संक्रांतीचे खण व चुड्या-पाटल्या खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी
मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर महिला खणाची पूजा करतात. तसेच सौभाग्याचे प्रतीक म्हणून चुड्या-पाटल्या हातात घालतात. त्या अनुषंगाने खण व चुड्या-पाटल्या खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.
दोन वर्षांपूर्वी ५ हजार रुपयांना मिळणारी मातीची खेप सध्या ११ हजार रुपयांना मिळते.भुसा,लाकूड व इतर खर्चाचा विचार करता आम्हाला हा धंदा परवडणारा नाही. संक्रांतीचे खण ६० ते ७० रुपये किंमतीला विकले जातील तेव्हा आमच्या कामाचे मोल होईल. परंतु, ग्राहक ते ३० ते ४० रुपये एवढ्या किंमतीत मागणी करतात. त्यामुळे आम्हाला मजुरी मिळणे ही अवघड आहे.
संक्रातीकरीता तीळगूळ, तिळाचे लाडू, तिळाची चिक्की,गुळाच्या रेवढ्या,साखर रेवडी,हलव्याचे दागिने,गावरान तीळ,बताशे,मुरमुरे आदी वस्तुंना ग्राहकांची मोठी मागणी आहे. परंतु, साखरेचे व गुळाचे दर न वाढल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेने या पदार्थांचे दर स्थिर आहेत.