पुण्यातील गुन्हेगारीवर नेत्यांची चुप्पी..! एक केंद्रीय मंत्री, एक राज्याचे मंत्री, आमदारांना पुण्याचं काहीच पडलं नाही
पुणे : गुन्हेगारीत पुण्याचा पॅटर्न राज्यभर गाजलेलाच आहे. पण, कधी काळी ही गुन्हेगारी ठराविक साच्यात होती. त्यांचा सार्वजनिक महोत्सवात किंवा सर्व सामान्यांना त्रास नव्हता. टोळी युद्धही दोन गटापुर्ते मर्यादित होते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून टोळी युद्धाचा उडालेला भडका, टोळ्यांच्या सदस्यांचा नंगानाच, नवख्या गुन्हेगारांकडून दिवसा ढवळ्याही बंदुकींतून उडणारे बार व सर्व सामान्यांना होणारा त्रास व त्यांच्यावरील हल्ले तसेच सार्वजनिक महोत्वासात गुन्हेगारांचा मुक्त वावर आणि त्यामधून रिल्स अशा घटनांनी पुणेकर त्रस्त असताना पुण्यनगरीचा ‘मी’च, नेता म्हणणारे सर्वच राजकीय नेते चुप्पी घेऊन बसल्याने त्यांची भूमिका पुणेकरांच्या पचनी पडेनासी झाली आहे. सर्व काही पोलिस यंत्रणेच्या भरोशावर सोडून नेत्यांच्या या मौनामुळे पुण्याची कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.
शहरातील गुन्हेगारांकडून सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. पोलिस कारवाई करत असले तरी स्थिती मात्र सुधारत नसल्याचे वास्तव आहे. कुख्यात टोळ्यांचा काही काळ शांत गेला असला तरी टोळ्यांमध्ये नव्याने सहभागी झालेल्या नवीन गुन्हेगारांकडून भाईगिरीची दहशत दाखविण्यासाठी अधून-मधून प्रयत्न होत आहेत.
हेदेखील वाचा : Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण
वर्षाच्या सुरूवातीलाच कोथरूड भागात शिवजयंतीच्या दिवशी गजानन मारणे टोळीने देवेंद्र जोग याला बेदम मारहाण केली. त्यानंतर नेत्याच्या दबावाने पोलिसांनी टोळीवर कारवाई केली. विशेष म्हणजे, अद्यापही यातील दोन सराईत पोलिसांना सापडलेले नाहीत. आता पुन्हा कोथरूडमध्ये नीलेश घायवळ टोळीने रस्ता न दिल्याने एका तरुणावर गोळीबार केला. तर, थोड्या अंतरावर जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनांशिवाय धमक्या, वाहनफोड, दहशत निर्माण करण्याचे प्रकार सुरूच आहेत
यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत गजानन मारणे मंडळाची थाटात मिरवणूक निघाली. त्यात सहभागी सराईत गुन्हेगार, हा चर्चे विषय झाला. टिळक रोडची मिरवणूक उशिरा संपण्याचे कारणही गुन्हेगारांनी मिरवणूकीत घेतलेला सहभाग. केवळ टिळक रोडच नव्हे तर वेगवेगळ्या भागातही सराईत व कुख्यात गुन्हेगारांनी विसर्जन मिरवणूकीदरम्यान, पुन्हा वापसी केल्याचे चित्र निर्माण झाले. इतके होऊनही पुढे काहीच झाले नाही.
कधीकाळी गुन्हेगाराचा फ्लेक्सवर फोटो लागला तरी त्या गुन्हेगाराला अन् फ्लेक्स लावणाऱ्याचा घाम फोडला जात होता. सतत ‘गुन्हे शाखेकडून त्यांना पाचारणकरून मस्ती उतरवली जात होती. आता मात्र “कायदा सुव्यवस्था उत्तम आहे” अस म्हणून पोलिस आलेला दिवस पुढे ढकलत असल्याचे दिसत आहे. गुन्हेगारांचे राजकीय लागेबांधे, भविष्यातील निवडणुका तसेच त्याचा होणारा फायदा लक्षात घेऊन सोयीस्कररित्या राजकीय नेत्यांकडून डोळेझाक केली जात असल्याचे जानकर सांगतात.
कोणत्या ना कोणत्या टोळ्यांचे संबंध हे राजकीय पक्ष किंवा नेत्यांशी पडद्या आडून आहेत. त्यामुळे याकडे सर्वच काळानुसार भूमिका बजावत असल्याचे वास्तव आहे. एका कुख्यात गुन्हेगाराने न्यायालयाची परवानगी घेऊन पुण्यात प्रवेश केला आणि शेकडो तरुणांना घेऊन शक्तीप्रदर्शन केले. तो एका संघटनेत प्रवेश करू इच्छित होता. पण, आधीच वातावरण गरम असल्याने पोलिसांनी त्याला पळवता केले.
त्यामुळे असं सर्व घडत असताना नेतेगन कोणतेही विधान करत नाहीत, याचे आश्चर्य आता पुणेकरांना वाटू लागले आहे. दुसरीकडे “शहराच्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रतिनिधींची धार नेमकी कुठे हरवली आहे ? हाही त्यांना प्रश्न पडला आहे. एकूणच सतत वाढणारी गुन्हेगारी, राजकीय मौन आणि पोलिस यंत्रणेवरच सोपवलेली जबाबदारी या सगळ्यामुळे पुण्याची कायदा-सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याची नागरिकांची भावना आहे.