प्रभागरचना सत्ताधाऱ्यांना अनुकूल! चुकीचे काम करणाऱ्यांना सोडणार नाही; महाविकास आघाडीचा इशारा
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारुप तयार झाले आहे. मात्र, सत्ताधारी पक्षांनी प्रभाग रचना त्यांना अनुकूल हाेईल अशा पद्धतीने केली आहे. प्रभाग रचना तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांना बाेलावून त्यांच्या साेयीची रचना केली आहे, असा आराेप महाविकास आघाडीने केला आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराची प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने बनवली आहे. ही प्रभाग रचना करताना महापालिका अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षासमोर सपशेल लोटांगण घातले आहे. प्रभाग रचनेसंदर्भात महाविकास आघाडीने चर्चेसाठी वेळ मागितली होती. मात्र, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आम्हाला वेळ दिली नाही, असा दावा महाविकास आघाडीने केला आहे.
घटक पक्षांची पत्रकार परिषद
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी पत्रकार परीषदेत प्रभाग रचनेसंदर्भात भुमिका स्पष्ट केली.
आयुक्त सरळसरळ पक्षपातीपणे काम करत आहेत. मात्र, सेवेतील अधिकारी असो की यापुढे निवृत्त होणाऱ्या पण चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा थेट इशाराच पुणे शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे. तसेच या सर्व प्रकाराबाबत आम्ही निवडणूक आयोग आणि राज्याच्या नगरविकास खात्याला पत्र देणार असल्याचे सांगितले.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची कार्यवाही प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. मात्र, या प्रभाग रचनेच्या कामकाजात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा हस्तक्षेप चिंतेची बाब आहे, असा आरोप करीत जगताप म्हणाले की, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना आम्ही वारंवार चर्चेसाठी वेळ देण्याची मागणी केली. पण आम्हाला चर्चेला त्यांनी बोलावलेच नाही. आयुक्तांनी केवळ सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांना सर्किट हाऊस येथे बोलावले. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. कायदा पाळणाऱ्यांनी केवळ सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली ही प्रभाग रचना तयार केली आहे.
चुकीचे काम करणाऱ्यांना सोडणार नाही
काँग्रेसचे अरविंद शिंदे म्हणाले की, सत्ताधारी पक्षांना हवी तशी प्रभाग, वॉर्ड रचना तयार करुन देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे. कारण, महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नियमाला बगल देत सत्ताधारी पक्षांना फायदा होईल अशी प्रभाग रचना तयार केली आहे. हे सरळसरळ चुकीचे आहे. अशा पद्धतीने चुकीचे काम करणाऱ्या सध्या सेवेत असणारे अधिकारी अथवा भविष्यात हे अधिकारी निवृत्त जरी झाले तरी त्यांना आम्ही सोडणार नाही. चुकीच्या कामाबद्दल आम्ही त्या सर्व अधिकाऱ्यांना कायदेशीरपणे शिक्षा देणार आहे.
शिवसेनेचे मोरे आणि थरकुडे म्हणाले की, प्रभाग रचनेतील सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप व त्याचा निवडणुकांवर होणारा दुष्परिणाम याबाबत महाविकास आघाडी सातत्याने आवाज उठवत आहे. मात्र, प्रशासनातील अधिकारी पक्षपातीपणे काम करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. प्रशासनाने तटस्थपणे काम करणे आपक्षित आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून प्रशासन काम करत असेल तर हे चुकीचे आहे. या चुकीच्या कामाबद्दल त्यांना भविष्यात त्रास होणार आहे, हे लक्षात ठेवावे.