म्हसवड : म्हसवड शहरात रामलल्ला प्रतिष्ठापणा सोहळा विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी कुठे धार्मिक विधी, तर कुठे मंत्रपठण, कुठे रामरक्षा, कुठे हनुमान स्तोत्र पठण, तर काही ठिकाणी हनुमान चालीसा आदींचे सामुहिक वाचन करण्यात आल्याने अवघी म्हसवड नगरी ही रामनगरी बनल्याचा आभास जाणवत होती.
अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होत असल्याने समस्त हिंदु धर्मियांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे, यानिमीत्त २२ जानेवारी हा दिवस एकप्रकारे दिवाळी सणाप्रमाणेच सर्वत्र साजरा होत आहे. म्हसवड शहरात ही यानिमीत्ताने सर्वत्र मोठा उत्साह दिसुन आला. सकाळी ६ वाजलेपासुनच या आनंदी सोहळ्यास सर्वत्र शुभारंभ करण्यात आला, येथील श्रीराम मंदिरात भल्या पहाटे प्रभु श्रीरामाची काकड आरती संपन्न झाली, मंदिरातच सकाळच्या प्रहरी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर मंदिर व परिसरात सामुहिक रामनामाचा जप सुरु होता, तर सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिरापासुन रामनामाचा जय घोष व जप करीत भव्य अशी फेरी काढण्यात आली, या फेरीमध्ये म्हसवड येथील सर्वच समाजाचे रामभक्त हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते, यामध्ये महिलावर्गाची उपस्थिती ही लक्षणीय होती. या फेरी मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रामभक्ताने डोक्यावर श्रीरामाच्या नावाची भगवी टोपी तर खांद्यावर भगवा गमजा, हाती भगवे वस्त्र, महिलांनीही भगवे फेटे, भगव्या साड्या परिधान केल्या होत्या, तर शहरातील प्रत्येक गल्ली बोळासह, मुख्य रस्ते, चौक याठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण म्हसवड नगरी ही भगवी व रामनगरी बनल्याचे दृष्य पहावयास मिळाले. या फेरीमध्ये माण – खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी आपल्या पत्नीसह सहभागी होत रामनामाचा जयघोष केला. संपूर्ण शहराला नगरप्रदक्षणा घालुन सदर फेरी पुन्हा येथील राममंदिरासमोर उभारण्यात आलेल्या भव्य शामीयान्यात आली असता याठिकाणी पद्माकर शास्त्री वाळुंजकर, आप्पा देसाई, रत्नदिप शेटे यांनी रामरक्षा म्हटली यावेळी उपस्थित रामभक्तांनी एका सुरात रामरक्षा म्हटल्याने याठिकाणी धार्मिक वातावरण निर्माण झाले. तद्नंतर महाआरती संपन्न झाली तर दुपारी १२ वा. २९ मिनिटांनी श्रीरामाच्या मुर्तीस सर्वांनी मोठ्या श्रध्देने अक्षदा वाहत रामलल्लाचा जय घोष केला. यानंतर मंदिरात प्रसाद वाटण्यात आला.
येथील राममंदिराप्रमाणेच शहरातील विविध ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम यानिमीत्त ठेवण्यात आले होते, येथील डोंगरेवाडा परिसरात, व भगवानगल्ली येथे देशमाने यांच्या निवासस्थानी, येथील हनुमान मंदिर येथे, सिध्दनाथ मंदिरात, तर मेगासिटी येथे श्रीमती रेखा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी प्रभु श्रीरामलल्लाच्या प्रतिमेवर अक्षदा वाहण्यात आल्या यावेळी वरील सर्व ठिकाणी विविध प्रकारची आकर्षण आरास व सजावट करण्यात आली होती. येथील हनुमान मंदिर येथेही यानिमीत्ताने सजावट करण्यात येवुन धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यानिमीत्त हनुमान मंदिर व मेगासिटी येथील कुलकर्णी यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
म्हसवड शहरातील डॉक्टरांकडुन रामभक्तांना पेढे वाटप
म्हसवड शहरात रामलल्ला ची सकाळी फेरी काढण्यात आली त्यावेळी शहरातील सर्व डॉक्टरांनीही याठिकाणी भगवे वस्त्र परिधान करुन रामनामाचा जयघोष करीत उपस्थित सर्व रामभक्तांना पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.
श्री हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
म्हसवड शहरात असलेल्या काळा मारुती मंदिरात यानिमीत्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तर संपूर्ण मंदिर हे पणत्यांनी सुशोभित करण्यात आले होते. यानिमीत्त मंदिरात भजन, मंत्रोपच्चार, हनुमान चालीसा, रामनामाचा जप आदी कार्यक्रम दिवसभर सुरु होते, याठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम मंदिर सजले आकर्षक फुल सजावटी ने व विद्युत रोषणाईने
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्यानिमीत्त येथील श्रीराम मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर संपूर्ण मंदिराला विविध फुलांची सजावट करण्यात आल्याने श्रीराम मंदिराचे रुपडे पालटले होते.