धक्कादायक! सीना नदी पात्रात 4 उसतोड कामगार बुडाले; शोध सुरु
कुर्डुवाडी : दिवाळी हा सण प्रत्येकासाठी विशेष असतो. लक्ष्मीपूजन, फटाके आणि दीपोत्सवाव्यतिरिक्त देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान संगीत फक्त जुन्या आठवणी जागवत नाही, तर दिवाळीचा आनंदी देखील उत्साहित करते. दरम्यात दिवाळी सण सगळीकडे साजरा केला जात असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खैराव (ता. माढा) येथील सीना नदीपात्रात चार उसतोड कामगार बुडाल्याची घटना घडली आहे. बुडालेले चारही उसतोड कामगार हे यवतमाळ जिल्हातील आहेत. गुरुवार (दि. ३१) दुपारी बाराच्या सुमारास खैराव येथील सीना नदीपात्रात ही घटना घडली.
शंकर विनोद शिवणकर (वय २५), प्रकाश धाबेकर (वय २६, दोघॆ रा. लासण टेकडी, ता. यवतमाळ) व अजय महादेव मनगाव (वय २५), राजीव गेडाम (वय २६, दोघे रा. पटा पांगरे, जि. यवतमाळ) अशी नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
माढा तालुल्यातील खैराव येथील जगदाळे वस्ती येथे यवतमाळ जिल्ह्यातील उसतोड कामगारांची टोळी आली होती. या टोळीतील चार उसतोड कामगार खैराव येथील सीना नदीपात्रात कपडे धुण्यासाठी व अंघोळीसाठी गेले होते. त्यातील शंकर हा प्रथम पाण्यात गेल्यावर बुडायला लागल्यावर प्रकाश त्या वाचवण्यासाठी गेला असता तो बुडू लागल्याने इतरही दोघे पाण्यात उतरले. नदीमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने भोवरा निर्माण झाला आहे. याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले असून बुडालेल्या चौघांचा शोध सुरू आहे.
मुळशीतील तलावात बुडून दोघांचा मृत्यू
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली मुळशी तालुक्यातील खांबोली तलाव परिसरात मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तलावात पोहोण्यासाठी उतरल्यानंतर दोघेही गाळामध्ये अडकले. त्यानंतर दोघेजण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.
फर्ग्युसन महावि्द्यालयात पदव्युत्तर पदवी (एम.एससी इलेक्ट्राॅनिक्स) विभागातील विद्यार्थी ओजस कठापुरकर, राज पाटील, तसेच मित्र- मैत्रिणी असे नऊजण रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून खांबोली तलावाजवळ फिरण्यासाठी आले होते. तेथे गेल्यानंतर सर्वजण पाण्यात उतरले. त्यावेळी ओजस आणि राज तलावात साचलेल्या गाळात अडकले. त्यांच्याबरोबर असलेले मित्र पाण्यातून बाहेर पडले. ओजस आणि राज गाळात अडकल्याची माहिती त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ओजसला बाहेर काढले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्थानिक डाॅक्टरांनी सांगितले. गाळ्यात अडकलेल्या राजचा जवानांनी शोध घेतला. त्याला बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.