
उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती
पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले हे तिघे आज मुलाखती घेणार आहेत. तिघांकडेही प्रत्येकी विधानसभा मतदार संघ वाटून दिलेले आहेत. धीरज घाटे यांच्याकडे तीन, गणेश बीडकर यांच्याकडे तीन आणि श्रीनाथ भिमाले यांच्याकडे दोन अशा पुण्यातील आठ विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यात त्या-त्या प्रभागातील माहिती, उमेदवारांची इच्छाशक्ती, आधी केलेली काम आणि सामाजिक वर्चस्व पाहून उमेदवारी देणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मागील तीन दिवस भाजपा कार्यालयात प्रत्येक प्रभागासाठी मॅरॅथॉन बैठका घेण्यात आल्या. त्यात सामाजिक स्थिती, मतदारांचा कल, भौगोलिक स्थिती, २०१७ च्या निवडणुकीच्या वेळची स्थिती याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर या सगळ्यांची नोंद करुन त्याचा ड्राफ्ट भाजपकडून तयार करण्यात आला आहे. आता भाजपची उमेदवारी खेचून आणण्यासाठी इच्छूकांसाठी काही प्रमाणात कठीण असल्याच्या चर्चा आहे. पुण्यात २०१७ मध्ये भाजपाचे ९८ नगरसेवक होते. त्यात आता शिवसेनेच्या ५ उमेदवारांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. तर भाजपा आता १२५ नगरसेवक निवडून आणण्याच्या तयारीत आहे. २०१७ मध्ये काही किरकोळ मतांनी पराजय झालेल्यांना पुन्हा संधी देण्याच्या तयारीतदेखील भाजपा दिसत आहे.