सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
तासगाव : तासगाव तालुक्यातील सावळज गावच्या ग्रामपंचायतीत आज मोठी राजकीय घडामोड घडली. ग्रामपंचायतीतील आमदार रोहित पाटील गटाच्या सत्ताधारी आणखी ३ तर विरोधी सदस्यातील १ अशा तब्बल ४ सदस्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. राजीनाम्यामध्ये सावळज गावच्या माजी सरपंच स्वाती पोळ, माजी उपसरपंच संजय थोरात यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या शोभा सुतार व सुवर्णा पाटील यांचा समावेश आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे गावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण गेल्या ८ दिवसांमध्ये सावळज ग्रामपंचायतमध्ये सदस्यांकडून सलग राजीनामे देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, राजीनाम्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही सदस्यांनी अंतर्गत मतभेद, तर काहींनी विकासकामांकडे दुर्लक्ष व मनमानी कारभार झाल्याचा आरोप केला असल्याचे समजते. वारंवार चर्चा व सूचना करूनही प्रश्न सुटले नाहीत, त्यामुळे अखेर सामूहिक पद्धतीने राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मिळते.
या घडामोडीनंतर ग्रामपंचायतीची सत्ता धोक्यात आली असून, पुढील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. प्रशासनाकडे या सर्व राजीनाम्यांची नोंद झाली असून, आगामी काळात गावात नवीन राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर आगामी निवडणुकांचे राजकारण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
दरम्यान, जवळपास एक वर्षापूर्वी एका महिला सदस्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता. तर मागील आठवड्यात सावळज मधील ४ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला होता. ह्यापैकी एका सदस्यांनी आपला राजीनामा माघारी घेतल्याचे सोशल मीडियात जाहीर केले आहे. इतरही सदस्यांची मनधरणी सुरू असताना मंगळवारी माजी सरपंच- उपसरपंचसह ४ सदस्यांनी सामूहिकपणे ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता राजीनामा दिलेल्या सदस्यांची संख्या ९ वर पोहोचली आहे. या सर्व राजकीय घडामोडीकडे आमदार रोहित पाटील लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
या आठवड्यात ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांनी माझ्याकडे तर चार सदस्यांनी ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. आठ पैकी एका सदस्याने राजीनामा परत घेतलेला आहे. अद्याप एकाही सदस्याचा राजीनामा मंजूर केलेला नाही. उर्वरीत सदस्यांनी राजीनामे दिल्याबाबतची माहिती पक्ष नेतृत्वाला दिली आहे. पक्ष नेतृत्वाकडून याबाबत जे आदेश येतील त्यानुसार मासिक सभेत राजीनामा मंजूर करणे किंवा नामंजूर करणे याबाबत निर्णय घेतला जाईल.
– मिनल पाटील सरपंच ग्रामपंचायत सावळज