कोरेगाव : आता खळ उठलंय वस्ती उठायला वेळ लागणार नाही, अशा मोजक्या शब्दांत टीका करत आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधताना केली. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर त्यांचे मी घट्ट मिठीत घेऊन स्वागत करेन. कारण त्यातून मी असा अर्थबोध घेईन की त्यांना त्यांचे नेते चुकीचे होते, याची उपरती झाली असेल, असे मी समजेन असे नमूद केले.
कोरेगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महेश शिंदे यांच्याशी काही पत्रकारांनी संपर्क साधला. पत्रकारांनी महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधता प्रश्न विचारला शशिकांत शिंदे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत काय? या प्रश्नाला उत्तर देताना महेश शिंदे म्हणाले, “मला आनंद होईल. पण खरं तर हा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीमधील आहे. तसे म्हटले तर आज अनेक जण पक्ष प्रवेशासाठी रांगेमधे आहेत. पण तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होऊ शकतो. आज खळ उठले आहे, वस्ती उठायला वेळ नाही लागणार.”
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरही भाजपच्या वाटेवर असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी पुन्हा हा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट केले. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आपला समावेश होऊ शकेल का? असे विचारता महेश शिंदे म्हणाले, “आमचे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्णतः विश्वास असल्यामुळे मला संधी मिळेल असा विश्वास वाटतो.
पाहू या. काय होते.”
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आपण सहा महिन्यात सभासदांच्या ताब्यात घेऊ, असे आपण विधान केले असून, त्याला आधार काय? असे पत्रकारांनी विचारले असता महेश शिंदे म्हणाले,”मी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सहा महिन्यात नव्हे तर साडेतीन महिन्यात सभासदांच्या ताब्यात घेऊ असे म्हटले आहे. अस जे मी बोललो आहे ते मी माझ्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या विश्वासावर बोलतो आहे.”
जरंडेश्वर कारखाना असेल किंवा रयत शिक्षण संस्था असेल या संस्था जिल्ह्याच्या आहेत. त्या ताब्यात असाव्यात, अशी जनतेची इच्छा असल्यामुळे आणि त्याला वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ असल्यामुळे मी त्याचा पाठपुरावा नेत्यांकडे करत आलो आहे. त्यामुळे हे नक्की घडेल असा मला विश्वास आहे. कोरेगावची औद्योगिक वसाहत, विविध विकास कामे आदी विषयांवर महेश शिंदे यांनी आपली परखड मते व्यक्त केली.