राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसानं झोडपलं
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि.12) मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. दिवसभरात सर्वाधिक पाऊस जालन्यात झाला. तर त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरात पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. मान्सून वेशीवर आला आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे.
सध्या वातावरणात बदल होत असून, मान्सूनपूर्व पावसाने सध्या जोरदार हजेरी सुरु ठेवली आहे. मंगळवार, बुधवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी दिल्यानंतर गुरुवारी देखील मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक २३. ६ मिमी पाऊस जालना जिल्ह्यात तर २०. ६ मिमी छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यामधील चांदाई एक्को गावातील शंकर किसन तळेकर यांचा बैल गुरुवारी रात्री वीज पडून मयत झाला.
याच पावसात तळणी येथील शेतकरी पंडित गोविंदा गायके यांच्या शेतात देखील एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाला. यासोबतच हिसोडा बुद्रुक गावातील बाळासाहेब रामचंद्र जगताप यांच्या शेडचे गुरुवारच्या पावसामुळे नुकसान झाले. तर देऊळगाव कमान येथील शेतकरी श्रीराम कबीरदास पवार यांची एक शेळी पावसामध्ये अंगावर वीज पडून मरण पावली आहे.
यासोबतच जिल्ह्याच्या वझर येथे सुमारे साडेपाचच्या दरम्यान पांडुरंग आसाराम जावळे यांच्या गायीवर वीज पडल्याने ती मयत झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मान्सून येत्या तीन ते चार दिवसात जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी देणे सुरु केले आहे. लाडसावंगी परिसरात गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने आंब्याची झाडे अशी कोसळली होती.