नीट परिक्षा पेपर फुटीवर जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींंना घेरलं
सांगली : सध्या देशभरामध्ये नीट परिक्षांवरुन मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. नीट परिक्षेचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे देशभरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला असून नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहे. जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
सोशल मीडियावर पोस्ट करत जयंत पाटील यांनी नीट परिक्षेमधील गोंधळावर रोष व्यक्त केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत. पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे,’असा घणाघात जयंत पाटील यांनी केला आहे.
नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत. पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर… — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 23, 2024
पुढे ते म्हणाले, ‘अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत. या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल,’असा गंभीर आरोप देखील जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे.