shivswarjya yatra 2
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून शरद पवार गट देखील कामाला लागला आहे. शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते मुंबईमध्ये दाखल झाले असून त्यांच्यामध्ये चर्चा पार पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधून आपली रणनिती सांगतली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार गटाकडून शिवस्वराज्य यात्रा 2 ची घोषणा करण्यात आली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये जनजागरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण राज्य सरकारच्या नीतीमुळे राज्य अधोगतीला जायला लागलं आहे आणि ज्या पद्धतीने राज्य चालू आहे. तसेच कायदा व्यवस्था नसून राज्यातील तरुणांच्या हाताचे काम शेजारचे राज्य हिसकावून घेत आहेत. हे सर्व चालू असताना राज्यकर्ते स्तब्ध बसले आहेत. युतीचे सरकार आल्यापासून राज्य मागे चालले आहे. आम्ही महायुतीचे काळे कारनामे घेऊन आलो आहोत,” असे म्हणत जयंत पाटील यांनी महायुतीचे काळ कारनामे लिहिलेला पोस्टर दाखवले आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवीन ट्वीस्ट आला आहे.
ऑक्टोबरची निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याचा प्रयत्न
पुढे ते म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी लढणार आहोत. जनतेच्या आणि बहुजनांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने पुन्हा एकदा राज्य कारभार सांभाळण्यासाठी आम्ही निर्धार केला आहे. त्यासाठी जनतेमध्ये जाणार आहोत. लोकसभेच्या निवडणूकीमध्ये राज्य सरकारवर व केंद्र सरकारबाबत जनतेने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. महाराष्ट्रातील बहाद्दूर जनतेने देखील त्यांना बाहेर काढण्याचे ठरवले आहे. त्यामुळे घाबरून तिजोरी मोकळी करत योजना जाहीर करत आहेत. अशा घोषणा लोकांना देखील पटत नाही. महाराष्ट्राचे सरकार घाबरलेले असून ऑक्टोबरमध्ये होणारी निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची बुद्धी यायला लागली आहे. अशी मला शंका आहे. नोव्हेंबरच्या 15 तारखेनंतर निवडणूक घेण्यात यावी असे हे प्रयत्न करत आहेत. योजनांचे पैसे लोकांना देण्यासाठी हे त्यांचे काम सुरु आहे,” असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शिवस्वराज्य यात्रा 2 जाहीर
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर शिवस्वराज्य यात्रा 2 ची घोषणा केली आहे. “ही यात्रा येत्या 9 ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. खासदार अमोल कोल्हे हे प्रमुख प्रचारक असून हाच दिवस घेण्याचे प्रयोजन म्हणजे हा दिवस खास आहे. या दिवशी चले जाओ यात्रेचा नारा देण्यात आला. तसेच जागतिक आदिवासी दिन देखील आहे. त्यामुळे हा दिवस आम्ही निवडला आहे. 9 तारखेला सकाळी 9 वाजता शिवनेरीवरुन या यात्रेला सुरुवात होईल. जुन्नरमधून ही यात्रा सुरु होणार असून यामध्ये शरद पवार गटाचे सर्व नेते सामील होणार आहेत,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.