'त्यांचं आमच्याशी जुनं नातं'; जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर अजित पवारांचं विधान
राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा फेटाळून लावला असला तरी पक्षांतर्गत नेतृत्वबदलाच्या शक्यतेने या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. दरम्यान, शशिकांत शिंदे यांचं नाव नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पुढे येत असून, त्यांनी स्वतःच माध्यमांशी बोलताना आपण त्या शर्यतीत असल्याचं म्हटलं आहे.
Pravin Gaikwad Ink thrown : मोठी बातमी! अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर शाईफेक
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आले असता, त्यांना पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत विचारलं.
अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील आमचे जुने सहकारी आहेत. नव्वदच्या दशकात आम्ही एकत्र राजकारणात आलो. आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील, आम्ही सगळेच एकाच बॅचचे. अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे, त्यामुळे वैयक्तिक संबंध उत्तम आहेत. मात्र, आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत, हे सर्वज्ञात आहे.”
“जयंत पाटील तुमच्या गटात येणार का?” असं यावेळी अजित पवार यांनी विचारण्यात आलं, त्यावेळी अजित पवार म्हणाले, “ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी राजीनामा का दिला, हे मला माहिती नाही. विचारण्याचा अधिकारही नाही. मात्र अधिवेशनात भेट झाली, तर सहजपणे यावर चर्चा करू शकतो. त्यांनी आता इतरांना संधी देण्याचा विचार केला असेल, किंवा कदाचित राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा विचार असावा, असं उत्तर त्यांनी दिलं आहे.
या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रतिक्रिया देण्यास सांगण्यात आलं. त्यांनीही संयमित प्रतिक्रिया देत म्हटलं, “हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. ज्यांनी राजीनामा दिला त्यांना आणि जे नवीन पदभार घेतील त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत.”
जयंत पाटील यांचा राजीनामा ही केवळ औपचारिकता आहे की कोणत्या मोठ्या राजकीय हालचालीचा भाग, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, त्यांच्या भविष्यातील निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं राजकीय लक्ष लागून राहिलं असून आता ते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.