जयंत पाटील राष्ट्रवादीत येणार का? अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'जयंत पाटील सीनियर नेते आहेत...'
मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्या जागी माजी मंत्री शशिकांत शिंदे हे पदभार सांभाळतील, असेही म्हटले जात आहे. असे असताना यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी विधान केलं. ‘जयंत पाटील यांच्या पक्षात काय आहे, ते त्यावर बोलतील. पण, जयंत पाटील सीनियर नेते आहेत. त्यांनी राजीनामा का दिला, हे आपल्याला विचारायचा अधिकार नाही’.
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘निवडणुका जवळ आल्या आहेत. मी पालकमंत्री आहे. पुणे महानगरपालिका आमच्याकडे होती, अनेक वर्ष दोन्ही महानगरपालिका सत्तेत होतो. शहरातील अनेक प्रश्नांदर्भात बोलणी झाली आहे. संघटना वाढवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. निवडणुका एकत्रित लढवायच्या का? यामध्ये सगळे निर्णय युतीबाबत वरिष्ठ घेतात. दरम्यान, बीड प्रकरणावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. समर्थन कोणी करणार नाही. योग्य ती कारवाई होईल. मी पोलिस अधिक्षकांसोबत बोलून कारवाई करायला सांगेल’.
हेदेखील वाचा : Eknath Shinde Shivsena: शिलेदारांचे कारनाम्यांमुळे एकनाथ शिंदे अडचणीत; अचानक दिल्लीत दौरा, पक्षात अस्वस्थता
तसेच अहमदाबाद विमान अपघातप्रकणावर त्यांनी भाष्य केले. ‘अजून या घटनेचा एकच अहवाल आला आहे. आणखी एक अहवाल येणार आहे. मात्र, ते दोन्ही इंजिन बंद का केली आणि यात अमित शहा आणि पंतप्रधान स्वतः लक्ष घालून आहेत. लवकरच कळेल काय झालं ते’.
…तर त्यांना कारण विचारू
जयंत पाटील यांच्या पक्षात काय आहे, ते त्यावर बोलतील. जयंत पाटील सीनियर नेते आहेत. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलं आहे. त्यामुळे आमची ओळख आहे, संबंध आहेत. राजकीय भूमिका वेगवेगळी हे जग जाहीर आहे. त्यांनी राजीनामा का दिला, हे आपल्याला विचारायचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात भेटले, तर त्यांना कारण विचारू. अनेक वर्ष झाले, ते त्या पदावर आहेत. नव्याने संधी द्यायची असेल, म्हणून ते बाजूला झाले असतील, असेही त्यांनी म्हटले आहे.