सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही; गोपीचंद पडळकरांना अप्रत्यक्ष टोला
इस्लामपूर : “क्या बडा, तो सबसे दम बडा.. आपलं नाव ऐकलं नाय असं एक भी गांव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय, तर जयंत पाटील माझं नांव नाय..जाऊ द्या, वेळ येईल.. या शब्दात माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विरोधकांच्या टीकेला प्रथमच सडेतोड प्रत्युत्तर दिले. उरूण इस्लामपूर येथे युवा नेते प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित दसरा लोककला महोत्सवात जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी उपस्थित हजारो कलारसिक आणि कार्यकर्त्यांनी त्यांना टाळ्या आणि शिट्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
आमदार जयंत पाटील म्हणाले, “माझ्यावर टीका करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी काय समज दिली, त्याचा काय अर्थ घेतला गेला? समजले नाही; पण त्यांचे समर्थन केले गेले हे खटकते. माझ्या चौकशीवर ते बोलले. कसलीही चौकशी करा, नुसते बोलू नका. त्यांच्या चुकीच्या भाषेवर, त्याच्या समर्थनासाठी सभा घेतली जाते याचे आश्चर्य आहे. आमच्या जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. हे जाणीवपूर्वक केले जात आहे. येत्या निवडणुकीत त्याची प्रचिती माझी जनता देईल.
‘तुम्हाला राग येतो का?’ या प्रश्नावर मला राग आला आणि तो आपला असेल तर त्याला समजावून सांगतो, पण विरोधक असेल तर दुर्लक्ष करतो. जो आपला नाही, त्याला दुरुस्त करण्यात वेळ कशाला घालवायचा? असे त्यांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार यांना लोकांचे प्रश्न सोडवणे जमत नसेल तर त्यांनी बाजूला झाले पाहिजे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. महापुराच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, “नुकतेच जिल्ह्यातील आमचे एक तरुण सहकारी भाजपात गेले. त्यांच्या आजोबांचा इतिहास काय? एक आमदारकी मिळण्यासाठी ते तिकडे गेले. भाजपने कुणाची कसलीही पार्श्वभूमी न पाहता सगळ्यांसाठी दार उघड ठेवले आहे. निवडणूक आयोग अपारदर्शक कामकाज करत आहे. व्होटचोरी झालीच आहे, यात शंकाच नाही.”
सरकारवर टीका करताना पाटील म्हणाले, “लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचे कर्ज ९ लाख ५० हजार कोटींवर गेले आहे. येत्या काळात ते आणखी वाढेल. सरकार संकटात आहे. राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर लाखाच्यावर कर्ज आहे. देवस्थान जोडण्याच्या रस्त्यावर १ लाख कोटी खर्च करायला सरकारकडे रक्कम आहे, पण पूरग्रस्तांना मदत द्यायला पैसे नाहीत, ही शोकांतिका आहे.”
अजित पवार यांच्या संबंधांबद्दलच्या प्रश्नावर ते म्हणाले, पवार हे त्यांच्या पक्षा सोबत सत्तेत सहभागी झालेत, पण इतर काही लोक पक्ष सोडून भाजपात जात आहेत, हे पटत नाही. अजित पवार यांच्याबद्दल माझे मत चांगलेच आहे. ते राजकारणात खूप कष्ट करतात, भरपूर कामही करतात. पण निवडणुकीत त्यांनी इथे येऊन टीका केली. राजारामबापू साखर कारखाना दर देत नाही असे ते म्हणाले. एफआरपीनुसार कारखाना दर देतोच. माझ्या निवडणुकीत मी कधीही ऊसदरावर बोलत नाही, कारण सहकारी कारखाना माझी खासगी मालमत्ता नाही. तो विषयच वेगळा आहे. इथे येऊन जे बोलून गेले त्यांचा दर आणि तिथली परिस्थिती वेगळीच आहे.”
विशाल पाटील, रोहित पाटील यांच्याशी वाद नाही
पाटील म्हणाले, विशाल पाटील, रोहित पाटील यांच्याशी आपले कोणतेही वाद नाहीत. आम्ही एकत्रच काम करीत आहोत. मात्र जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा होत राहतात, त्यावर प्रत्येक वेळी स्पष्टीकरण दिलेच पाहिजे असे काही नाही. ईश्वरपूर नामकरणाला मी विरोध केलाच नाही पण हे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विचारले असते तर नावात ‘उरूण’ घालण्याची सूचना केली असती. माझ्या जनतेने मला तळहातावरील जपले आहे. विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे नरेटिव्ह पसरविले, त्यातून मताधिक्य कमी झाले. मात्र जो निकाल लागला तो मोकळ्या मनाने मान्य केला आहे.
हिंदुत्वात शूरपणा हवा. अहंकार नकाे
जयंत पाटील म्हणाले, मी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळा झालो आहे. सध्या मी माझ्या मतदारसंघात फिरत आहे. मात्र मला काही वेगळे वातावरण आहे, असे जाणवत नाही. वेगळा पर्याय शोधण्याची आम्हाला गरज नाही. फुले- शाहू-आंबेडकर यांना मानणारा आमचा भाग आहे. त्याच परंपरेतील आम्ही लोक आहोत. नव्या पिढीने आपले मूळ विसरायला नको. आम्हीही बहुसंख्य हिंदूच आहोत. मात्र हिंदुत्वात शूरपणा हवा. अहंकार आणि दमदाटी नसावी. हिंदुत्वावर मते मागणे भारतात फार काळ चालणार नाही.