मुंबई : अयोध्येमध्ये येत्या 22 तारखेला प्रभू श्री राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) पार पडणार आहे. मात्र या सोहळ्यावरुन भाजप (BJP) आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगताना दिसत आहे. भाजप हा सोहळा राजकीय करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. कॉंग्रेसने (Congress) देखील या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे, दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच भाजपने शंकराचार्यांना (Shankaracharya) वेड्यात काढलं असा घणाघात देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
येत्या 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, “22 तारीख आणि रामाची काहीही संबंध नाही. त्यादिवशी रामनवमी किंवा इतर तसा दिवसही नाही. तरी देखील भाजपला रामाच्या नावाने मत मागण्यासाठीच निवडणूकीसाठी 22 तारीख ठरवण्यात आली आहे. चारही शंकराचार्यांनी सांगितलं अपूर्ण वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. तुमच्या घराचं बांधकाम सुरु आहे आणि प्लास्टर झालं नसेल तर तुम्ही तरी राहायला जाल का? मात्र त्यांनी चार शंकराचार्यांनाच वेड्यात काढलं. भाजपाकडून विचारणा होते आहे की कोण शंकराचार्य? त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? आद्य शंकराचार्यम यांनी शैव आणि वैष्णव गटांमध्ये जेव्हा अंतर पडलं होतं तेव्हा या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. आदि शंकराचार्यांनी निर्माण केलेली ही पीठं आहेत. त्यांनाही मानणार नसाल तर तुम्हीच शंकराचार्य असं म्हणायची वेळ आलीये” अशी खोचक शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली.
पुढे ते म्हणाले, “भाजपने २२ जानेवारीला मुहूर्त काढला असेल. त्यांचं पंचांग वेगळं असेल. राम मंदिर होतंय यासाठी आम्ही आनंदी आहोत. मी पण आनंदी आहे. भाजपाकडून तो राम आमचाच आहे असं सांगितलं जातं आहे. ते चुकीचं आहे. राम बहुजनांचा आहे, राम क्षत्रिय आहे त्यांनी तो नसेल तर सांगावं. बहुजन लोक मटण खातात. रामाबद्दल जे काही बोललो त्यावर मी खेद व्यक्त केला. त्यानंतर मी काही वक्तव्य केलंही नाही. तरीही उपमुख्यमंत्री मटण खाणाऱ्या माणसाला शेण खातो असं म्हणत असतील तर देशातले 70 टक्के लोक शेण खातात. तुमच्यातलेही लोक शेणच खातात मटण खात नाही. कधी कधी ते पण मटण खातात. त्यांनी मटण आणि शेण एक करुन टाकलं.” असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.