
मुंबई : विनोदी लेखक आणि क्रीडा पत्रकार अशी ओळख असलेले शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचं निधन झालं. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, हृदयविकाराच्या धक्क्याने अखेर त्यांचं निधन झाले.
मुंबई विद्यापीठातून शिरीष कणेकर यांनी एलएलबीचं शिक्षण घेतलं. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केलं. यामध्ये इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक लोकप्रभा, मनोहर, चित्रलेखामधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत.
सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील त्यांचे वृत्तपत्रांतील स्तंभ प्रसिद्ध आहेत. शैलीदार लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर यांची ओळख होती. तर ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध आहेत. शिरीष कणेकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.