आनंदाची बातमी ! सातारकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; कास तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो
सातारा : राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे. त्यात सातारा शहराची लाईफलाईन असणारा कास तलाव गुरुवारी ओसंडून वाहू लागला. यावर्षी प्रथमच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावामध्ये आता अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सातारकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
सातारा पालिकेने सुरू ठेवलेली पाणी कपात लवकरच मुख्याधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर मागे घेतली जाणार आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने कमी दाबाचे क्षेत्र विकसित होऊन पश्चिम घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. सातारा जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा दृश्य परिणाम सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात विशेषत: महाबळेश्वर कास बामनोली, पाटण, जावली तालुक्यात मुसळधार पाऊस होऊन ओढे खळखळून वाहू लागले आहेत.
तब्बल साठ फूट पाणीसाठा
सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने गुरुवारी सकाळीच भरला आणि येथील नव्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. कास तलावात आता तब्बल साठ फूट पाणीसाठा झाला आहे. हे पाणी सातारकरांना वर्षभर पुरते.
सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
अर्धा टीएमसी पाणीसाठा असलेल्या कास तलावाचे नयनरम्य सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सातारा शहरासाठी तलावात दररोज दहा लाख लिटर पाणी उचलले जाते. जूनमध्येच यंदा पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने कास तलाव भरल्याने सातारकरांनी समाधान व्यक्त केले आहे.