कल्याण : एका तरुणाला दुचाकीवर बसवून म्हारळ येथे नेण्यात आले आणि धारदार शस्त्राने त्याला जखमी करुन त्याची लूट करण्यात आली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लूट करण्यात आलेल्या तरुणाचे नाव निरज यादव असे आहे. तो अंबरनाथ चिखलाेली परिसरात राहतो.
निरज हा ५ डिसेंबरला रात्री दोन वाजताच्या सुमारास शहाड जकात नाका येथून जात असताना त्याला एकाने आडवून त्याला जबरदस्तीने दुचाकीवर वसविले. त्याला म्हारळ येथे आड बाजूला नेले. त्याला धारदार हत्याने दुखापत करुन त्यांच्या जवळचे क्रेडीट आणि एटीएम कार्ड हिसकावून घेतले. त्याच्याकडून पासवर्ड मागितला. दिला नाही तर जीवे ठार मारु असे धमकाविले. त्याच्या क्रेडीट आणि एटीएमकार्डचा वापर करुन १६ हजार रुपये त्याच्या खात्यातून काढले. या प्रकरणी निरजने दिलेल्या तक्रारीच्या आधारे विनायक मदने, विजय आणि आर्यन या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत.