अहमदाबाद विमान दुर्घटनेत कराडची कन्या गमावली
कराड : अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर विमान कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. या अपघातात तब्बल 241 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत सदर विमानातून प्रवास करणाऱ्या कराड येथील ज्योती व प्रकाश ढवळीकर यांची मुलगी कल्याणी ढवळीकर हिचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी विमान अपघातात कराडची कन्या गमावल्यामुळे कराडकरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कराड येथील सोमवार पेठ भैरवनाथ गल्लीत ज्योती व प्रकाश ढवळीकर वास्तव्यास आहेत. त्यांची इंजिनिअर असणारी कन्या कल्याणी हिचा विवाह अहमदाबाद येथील उद्योजक गौरवकुमार ब्रह्मभट यांच्याबरोबर झाला होता. ते दोघेही अहमदाबादमध्ये राहत होते. एका कामानिमित्त ते अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर विमानातून ते प्रवास करत होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला.
हेदेखील वाचा : Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू; मेडिकल कॉलेजच्या 24 विद्यार्थी आणि डॉक्टरांचा समावेश
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजतात कल्याणीचे आई, वडील, भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही बातमी कराड शहरात पसरली. त्यामुळे कराडची एक कन्या गमावलीची हळहळ कराडकर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दोन्ही मुले घरीच असल्याने वाचली
कल्याणी व गौरवकुमार ब्रह्मभट दोघे लंडनला विमानाने निघाले होते. मात्र, या प्रवासादरम्यान त्यांनी आपला मुलगा व मुलीला घरीच कल्याणीच्या सासू-सासऱ्यांकडे ठेवले होते. मुलगा इयत्ता दहावीच्या वर्गात, तर मुलगी सहावीच्या वर्गात शिकत असल्याचे समजते.
लंडनला जाणारे विमान कोसळलं
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे विमान गुरुवारी कोसळलं. या अपघातात मृतांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात असलेल्या २४१ प्रवाशांचा आणि क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला आहे. विमान जवळच्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं, ज्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे.