
Painter and poet Baba Pawar expressed the plight of farmers through his poetry
कराड : राजेंद्र मोहिते : अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेली वस्ती, उघड्यावर आलेला शेतकरी, मुक्या जनावरांची झालेली फरफट आणि सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांचा उघडा फोलपणा या साऱ्या विदारक वास्तवावर कराड तालुक्यातील विंग येथील चित्रकार व कवी बाबा पवार यांनी आपल्या सडेतोड कवितेतून कडवा हुंकार दिला आहे. “औंदा ह्यो पाऽऊस, यळआधी असा कसा…” या प्रभावी शीर्षकाच्या कवितेतून त्यांनी निसर्गाच्या रौद्रतेइतकीच राजकीय व्यवस्थेची असंवेदनशीलताही निर्भीडपणे उघडी पाडली आहे. ही कविता केवळ शब्दांची मांडणी नसून, शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण समाज आणि सर्वसामान्य माणसाच्या वेदनांची जाहीर साक्ष ठरते.
विंग या छोट्याशा गावचे रहिवासी असलेले बाबा पवार हे हाडाचे चित्रकार तर आहेतच, पण तितकेच संवेदनशील आणि समाजभान जपणारे कवीही आहेत. सेवानिवृत्त कलाशिक्षक असलेल्या पवार यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक कलाकार घडवले. १९८२ पासून त्यांनी कुंचल्यातून साकारलेली असंख्य पेंटिंग्ज अनेक संस्था, मान्यवरांकडे असून, त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही लाभले आहेत. गेल्या १७ वर्षांपासून पवार यांनी एक आगळा-वेगळा, समाजप्रबोधनाचा उपक्रम सुरू ठेवला आहे. मावळत्या वर्षाला निरोप आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करताना ते चित्र आणि कवितेच्या माध्यमातून संदेश देणारी शुभेच्छापत्रे तयार करतात. या अनोख्या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक, एशिया बुक आणि इंडिया बुक अशा वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये घेण्यात आली आहे.
हे देखील वाचा : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश
यंदा २०२५ या वर्षाला निरोप देत आणि २०२६ चे स्वागत करताना त्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्राला “व्यथा” या सशक्त कवितेतून शब्दरूप दिले आहे. गतवर्षी त्यांनी “दुनिया लै बदालल्या… आपलंच आपल्याला छळतंय” या चित्ररूपी काव्यातून समाजाची व्यथा मांडली होती.
यावर्षीच्या चित्ररूपी कवितेत अवकाळी, उधळणारा पाऊस केवळ शेतीच नव्हे, तर गरीबांचा संसार, कष्टकऱ्यांची आश्रय-उपजीविका आणि मुक्या जनावरांचे जीवही वाहून नेतो, हे विदारक वास्तव प्रभावी शब्दांत मांडले आहे. पावसाने अनेकांना पोरकं केलं, संसार उद्ध्वस्त केला; मात्र मदतीच्या नावाखाली येणारे नेते पाहणी, फोटोसेशन आणि कोरड्या आश्वासनांपुरतेच मर्यादित राहतात, असा बोचरा टोला कवीने लगावला आहे.
“सातबारा कोरा तुमचा, करणार आम्ही वादा आमचा” अशा घोषणा दिल्या जातात; मात्र प्रत्यक्षात शेतकरी, मजूर, कष्टकरी यांच्या हाती काहीच लागत नाही. पक्षांतर, खुर्ची वाचवण्याचं राजकारण, निवडणुकीपुरती मतांची आठवण आणि पाच वर्षांनी पुन्हा ऐकू येणारी आश्वासनं या साऱ्यावर कवीने उपरोधिक, पण अत्यंत तीव्र शब्दांत प्रहार केला आहे.
नेते बदलतात, झेंडे बदलतात; पण सामान्य माणसाचं नशीब बदलत नाही. थोड्या दिवसांची चैन आणि नंतरची उपासमार हीच त्याची नियती का, असा थेट सवाल उपस्थित करत कवी बाबा पवार लोकांना डोळसपणे जागं राहण्याचं आवाहन करतात. ही कविता साहित्यिक चौकटीपलीकडे जाऊन, निसर्ग आणि सत्तेच्या दुहेरी मारात भरडल्या जाणाऱ्या समाजाचा आक्रोश ठरते. बाबा पवार यांच्या शब्दांतून हा आक्रोश थेट काळजाला भिडतो.
हे देखील वाचा : ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये राज ठाकरेंवर अन्याय? आरोप होताच संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
औंदा ह्यो पाऽऊस, यळआधी असा कसा, उधळतऽ गरजतऽ आला, कितीक दिवस त्योऽऽ, वस्तीला ऱ्हाहूनऽ, ज्याऽऽम बदडून गेला ।। धुऽ धूऽ धुतलं पुन्हा, मिठीत वडून घ्येतलं त्येनं, कितीतरी पोरकी केली. हंऽबर्डा फोडून बसल्या जाग्याव तडपाऽडून किती, मुकीपण जीवानीशी गेली. पोशिंद्याला उघडा पाडून, सैर-भैर करुन त्येच्या, संसाराचा चिकूऽल केला. औंदा ह्यो पाऽऊस, यळआधी असा कसा, ….।।१।।
चित्रकार व कवी बाबा पवार म्हणाले की, “चित्र आणि कवितेच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधण्याचा हा उपक्रम गेली सतरा वर्षे सातत्याने राबवत आहे. या उपक्रमाची दखल अनेक महाराष्ट्रभर साहित्यिक, जाणकारांनी घेतली आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मिळालेली पुरस्कारांची मान्यता आणि जाणकार रसिकांचे प्रेम हीच माझी खरी प्रेरणा आहे. समाजातील वास्तव, वेदना आणि प्रश्न कलेतून मांडत राहणं, हीच माझी भूमिका आहे”