कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत येथील किरवली वाडी ते जुन्मापट्टीवाडीपर्यंत माथेरान डोंगर रांगेत असलेल्या 13 वाड्यांना जोडणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. मात्र रस्त्याचे काम वन जमीन मिळत नसल्याने सुरू केले जात नाही.त्यामुळे या आदिवासी भागातील दोन आदिवासी कार्यकर्ते हे 15ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आत्मदहन करणार आहेत.दरम्यान वन जमिनीचा प्रश्न गेली वर्षभर सुटला नाही आणि त्यामुळे या आदिवासी कार्यकर्त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
कर्जत तालुक्यात स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येवर हा रास्ता रोको करून आत्मदहन करणार आहेत. देश स्वातंत्र्याला 78 वर्ष होऊनही माथेरान डोंगर पटट्यातील 13 आदिवासी वाडयांना आजही रस्ता नाही.रस्त्या अभावी अनेक बांधवांना वेळेवर उपचार न मिळाल्याने (सर्पदंश,बाळंतपणा, विंचूदंश,इतर आजारपणामुळे) आपला जीव गमवावा लागला आहे. शालेय विद्यार्थी,मोलमजुरी करणारे अनेक बांधव,शेतकरी यांना रोजच अवघड वाट/मार्ग चालून आपले काम करावे लागत आहेत.रस्त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करता येत नाही.असे अनेक संकटांना रस्त्या नसल्याने रोजच डोंगरपट्टयातील आदिवासी बांधवांना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे रस्त्यासाठी अनेक वर्ष लढा देणारे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते बेकरेवाडी येथील जैतू सदू पारधी आणि गणेश हिरु पारधी दोघे स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आत्मदहन करणार आहेत.माथेरान नेरळ कळंब रस्त्यावरील हुतात्मा चौक येथे रस्ता रोको आणि नंतर आत्मदहन आंदोलन करणार आहेत.या दोन्ही कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन वन जमिनीचा प्रश्न निकाली लावणार का हा प्रश्न समोर आला आहे.