कर्जत /संतोष पेरणे : तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाली भूतिवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प बांधला आहे.या धरणासाठी जमीन देणारे प्रकल्प ग्रस्त यांना शासनाने कोणत्याही सोयी सुविधा पुरवल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रकल्प ग्रस्त यांना डावलून सुरू करण्यात येत असलेल्या बोटिंग उपक्रमाला स्थानिकांनी जाहीरपणे विरोध दर्शवला.दरम्यान,तेथील बोटिंग सेवेसाठी उद्घाटन सोहळ्याला आलेले पाहुणे यांना प्रकल्पग्रस्त यांच्याकडून काळे झेंडे दाखवून बाहेरील व्यक्तीला बोटिंग सुरू करण्यास दिल्याबद्दल निषेध केला.मुख्य उद्घाटक आमदार महेंद्र थोरवे या उद्घाटन सोहळ्यापासून दूर राहिले असून प्रकल्पग्रस्त यांचे प्रश्न ते कशा पद्धतीने हाताळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर पाली भूतिवली येथे असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पात गेली 23 वर्षे पाणी साठून आहे. पाटबंधारे प्रकल्प शेतीसाठी पाणी देण्यासाठी कालवे पूर्ण करीत नसल्याने धरणाच्या जलाशयात पाणी पडून आहे. त्यामुळे बळीराजाला दुबार शेती करता येत नाही आणि दुसरीकडे प्रकल्पग्रस्त यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा देखील देण्यात येत नाहीत.आपल्या मागण्यांसाठी या भागातील शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त यांनी मार्च 2025 रोजी कर्जत तहसील कार्यालय येथे उपोषण सुरू केले होते.त्यावेळी स्थानिक शेतकरी प्रकल्पग्रस्त आणि आदिवासी यांना डावलून कोणालाही धरणात पर्यटन केंद्र म्हणून बोटिंगची परवानगी देण्यात येणारं नाही असे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडून देण्यात आले होते.मात्र त्याच ठिकाणी नेरळ येथील रहिवाशी असलेल्या व्यक्तीला धरणात पर्यटन केंद्र म्हणून बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे.
पाली भूतिवली धरणातील बोटिंग सुविधेची सुरुवात करण्यासाठी कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे येणार होते.हा उद्घाटन सोहळा सायंकाळी पाच वाजता असल्याने स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त यांनी दुपार पासून धरण परिसरात गर्दी केली होती.त्यासाठी शेतकऱ्यांनी हातात काळे झेंडे आणि बॅनर घेऊन गर्दी केली होती.प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश गायकर, सचिव सचिन गायकवाड तसेच माजी उप सरपंच सचिन गायकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
प्रकल्पग्रस्त नसलेल्या व्यक्तीला बोटिंगचा ठेका दिला जात असून ही आमच्या प्रकल्पग्रस्त यांची फसवणूक आहे.आमच्या जमिनी धरणासाठी गेल्या असून आम्हाला कोणत्याही सोयी सुविधा मिळाल्या नाहीत.असे असताना दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीला बोटिंगची पराभवही देऊन शासन आमच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करीत आहे, अशी खंत प्रकल्पग्रस्त सचिन गायकर यांनी केली.आमच्या जमिनी गेल्या असून आम्हाला मासेमारी करून देत नाहीत आणि दुसऱ्या व्यक्तीला बोटिंगची परवानगी दिली जात आहे.हा आमच्यावर अन्याय असून शासनाने आमच्या आदिवासी लोकांच्या आणि प्रकल्पग्रस्त यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. देखील स्थानिकांनी सांगितले आहे.
आमदार तर आलेच नाहीत…
आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते बोटिंग सुविधेची सुरुवात होणार असल्याचे फलक कर्जत तालुक्यात लावण्यात आले होते.त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त हे आक्रमक झाल्याने पोलिसांनी प्रकल्पग्रस्त यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता .मात्र प्रकल्पग्रस्त कोणाचेही ऐकण्याचे मनस्थितीत नसल्याने आणि पाली भूतिवली धरणावर मोठ्या प्रमाणावर प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी जमल्याने बोटिंग सेवेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे धरणावर फिरकले नाहीत.नेरळचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे अल्पसंख्यक अध्यक्ष आयुब तांबोळी यांचे हस्ते बोटिंग सुविधेचा शुभारंभ झाला, असं स्थानिकांनी सांगितलं आहे.