रायगड/ भारत रांजणकर : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी सन 1961 मध्ये युसूफ मेहरअली सेंटरची स्थापना करून मागील सात दशके अविरत सेवा करणारे, देशातील 11 राज्यांमध्ये सेंटरच्या शाखा निर्माण करून हजारो दीनदुबळ्यांचे आधार बनलेले गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ.जी.जी. पारिख यांचे आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले आहे.
समाजवादी कसा दिसतो, हे चित्ररुपाने कुणाला सांगायचं झाल्यास, डॉ. जी.जी. पारिख यांचं नाव पहिले आठवतं. पांढरीशुभ्र दाढी, खादीचा कुर्ता, पायजमा, चेहऱ्यावरील मनमिळाऊ भाव आणि बोलण्यातील कमालीची आपुलकी असणारे जी.जी. पारीख खाच-खळग्यांचा, आड-वळणांचा प्रवास असताना, आजही जीजी ‘वृद्ध’ झाले नाहीत. ते वाढत्या वयानुसार आणखी नव्या उमेदीने विचार मांडतात, बोलतात. त्यांच्यातला उत्साह थक्क करणारा आहे.
1940 साली जीजी परीख मुंबईत आले. सेंट जॉर्ज कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत. तेव्हा ते अवघ्या 16 वर्षांचे होते. त्याच काळात देशात स्वातंत्र्याचा लढा यशाकडे मार्गस्थ झाला होता. 1942 च्या 7 आणि 8ऑगस्टला मुंबईत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मिटिंग होती. गांधीजींनी ‘छोडो भारत’ची घोषणा दिली. आणि गांधीजींच्या विचारांनी भारावलेले जीजी सक्रीयपणे लढ्यात उतरले.
स्वत:च्या कॉलेजमध्ये ब्रिटिशांविरोधात तीन दिवसीय बंद पुकारला. त्याची निदर्शनं म्हणून चर्चगेट स्टेशनला जाऊन रेल्वे रोखल्या. यात जीजींना पोलिसांनी पकडलं आणि त्यांना तुरुंगात डांबलं साधारण अठरा एकोणीस वर्षांच्या जीजींना पहिल्यांदा10 महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे लोकांच्या प्रश्नांसाठी तुरुंग वगैरे त्यांना नेहमीचे झाले.
1947 साली ते स्टुडंट काँग्रेसच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. ते मूळचे समाजवादी विचारांचे होते. पुढे आपल्या विचारांवर जगण्याचा निर्णय घेतला. लोकांसाठी ते कायम लढत राहिले.सहकारी चळवळ असो वा कामगार संघटना, किंवा खादी चळवळ असो, जी.जीं.चं योगदान बहुमोल आहे. अर्थात, त्यांनी या सर्व कार्याचा गवगवा कधीच केला नाही. सत्कार-समारंभ-गौरव वगैरे गोष्टींपासून ते कोसो दूर राहिले. आपल्या सत्ताकेंद्रांनाही जीजींची महती कळली नसावी. हे जीजींचं दुर्दैव नव्हे, तर आपले दुर्दैवं आहे.
आज खादीचा प्रचार-प्रसार आपणच सुरु केल्याचा आव आणत काहीजण चरख्यासोबत फोटो काढतात. अशांना आठवण करुन द्यावी वाटते, जी.जींनी खादी आणि खादीमागचा विचार स्वत:च्या आयुष्यात भिनवला. ते आजही खादीचे कपडे परिधान करतात. 1970 च्या दशकात तर त्यांनी ‘Make Khadi a fashion’ हा विचार मांडला होता.
30 डिसेंबर 1924 रोजी सौराष्ट्रमधील (गुजरात) सुरेंद्र नगरमध्ये जन्मलेल्या जीजींनी महाराष्ट्र आपली कर्मभूमी मानली. आणि अगदी काल-परवापर्यंत म्हणजे वयाच्या 101 व्या वर्षी अंथरुणात राहूनही त्यांचं कार्य अविरत सुरु ठेवले आहे. पनवेल जवळील कर्नाळा ग्रामपंचायत मधील तारा आणि बांधनवाडी इथे स्थित असलेली युसुफ मेहरअली सेंटर नावाची ही शाश्वत विकासाची प्रयोगशाळा पाहिल्यानंतर स्वतः गोल्ड मेडलिस्ट असलेले डॉक्टर यांनी उभे केलेले आभाळभर कार्य लक्षात येते. विशेष म्हणजे आपल्या तारुण्यातच जी जी पारीखांनी जे जे रुग्णालयाला आपले देहदान करण्याचे ठरविल्यामुळे आज सायंकाळी 4वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल येथील युसुफ मेहरअली मेमोरियल ट्रस्टच्या शाळेतील मैदानात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांचा देह जे जे रुग्णालयाला सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती जी.जी. पारिखांच्या कुटुंबीयांसह युसुफ मेहरअली सेंटरच्या व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली.