मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यातच सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज बेळगावला भेट देणार आहेत. हा महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावर्ती भाग आहे. या भागावर दोन्ही राज्ये स्वतःचा दावा करतात. बोम्मई यांनी महाराष्ट्रातील ४० गावांवर आपला हक्क सांगितला आहे. तर त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे सरकार महाराष्ट्राची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे.
बोम्मई यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, आमचे सरकार कर्नाटकच्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. जलसंकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात विलीनीकरणाची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे, असा बोम्मई यांनी दावा केला आहे. तथापि, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाव्यांचे खंडन केले आहे. कोणत्याही गावाने अलीकडच्या काळात कर्नाटकात विलीन होण्याची मागणी केलेली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची अवहेलना होत आहे. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारले आहे. आम्ही गप्प बसायचे हे खूप झाले. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचीही खिल्ली उडवली. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले होते की, सीमाभागातील मराठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. ४० गावांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे.