Karuna Munde's reaction to Dhananjay Munde's resignation Maharashtra Political News
बीड : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण तापले आहे. बीड हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेमध्ये आले आहे. अगदी विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांकडून देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर बीडचे पालकमंत्रिपद देखील मुंडेंना देण्यात आलेले नाही. यामध्ये कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवून करुणा मुंडे यांना पोटगी देण्यास सांगितले आहे. यामुळे करुणा मुंडे या चर्चेमध्ये आल्या आहेत. त्याचबरोबर आता करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. परळीत पाठवलेले नवीन एसपी चांगलं काम करत आहेत. मी फडणवीस यांना लवकरच भेटणार आहे असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. “मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप-खूप आभार मानते. आज परळी, बीडमध्ये जे चांगले एसपी साहेब पाठवले, त्यांचं खूप चांगलं काम चालू आहे. जे परळीत गुंड आहेत, त्यांना उचलून जेलमध्ये टाकण्याच जे काम सुरु आहे, त्याच्यासाठी मी फडणवीस साहेबांचे खूप-खूप आभार मानते. फडणवीस साहेब मी तुम्हाला लवकरच पुराव्यांसह भेटणार. एक बहीण म्हणून मला न्याय द्या” असे मत मांडून करुणा शर्मा यांनी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बीडमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. डिसेंबर महिन्यांमध्ये त्यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामध्ये वाल्मिक कराडचे नाव मास्टर माईंड म्हणून समोर आले. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये अर्थिक संबंध असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. वाल्मिक कराडसोबतचे अनेक फोटो आणि पुरावे समोर आल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. यामुळे बीडचे पालकमंत्रिपद देखील धनंजय मुंडेंना देण्यात आले नाही.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत होती. महायुतीमधील मित्रपक्षाचे नेते देखील धनंजय मुंडेंविरोधात भूमिका घेत आहेत. महाविकास आघाडीसह महायुतीमधील नेते देखील विरोधी भूमिका घेत असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपचे नेते व आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले.त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेऊन गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकारण तापले. या पार्श्वभूमीवर बीडचे एसपी बदलण्यात आले. या नवीन एसपीच्या कामाचे करुणा मुंडे यांनी कौतुक केले आहे.