Photo Credit- Social Media
मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि रत्नागिरी-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत, आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे कोकणातील ठाकरे गट कमकुवत झाला असला, तरी शिंदे गटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राजन साळवी यांच्या प्रवेशानंतर राजापूर-लांजा मतदारसंघात शिंदे गटातील अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, साळवी यांना त्यांच्या मतदारसंघात स्वीकारले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. “राजन साळवी यांचे भूत आमच्या डोक्यावर नको. शिंदेसाहेबांनी आम्हाला हे मढ लादू नये. जर त्यांचा पक्षप्रवेश झाला असेल, तरी त्यांच्या हस्तक्षेपाला आम्ही आमच्या मतदारसंघात थारा देणार नाही,” असे संतप्त प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
त्याचबरोबर, “मागील १५ वर्षांत त्यांनी काय विकास केला, हे जनतेला दिसले आहे. मतदारांनी नाकारलेल्यांना पुन्हा आमच्यावर लादू नये. आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. राजन साळवी यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढली असली, तरी स्थानिक पातळीवर नवीन संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झाली. मात्र आता राजन साळवी हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे. विरोधकांनी तपास यंत्रणाच्या चौकशीचा ससेमीरा मागे लागल्यामुळे राजन साळवी शिंदे गटामध्ये जाणार असल्याची टीका केली होती. मात्र आता राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे.
राजन साळवी यांनी पक्षप्रवेशापूर्वी पत्रकार परिषद घेत शिवबंधन तोडण्याचे कारण देखील सांगितले आहे. राजन साळवी म्हणाले की, “नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या प्रभावाला कारणीभूत असून, त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं. याबाबत मी उद्धव ठाकरे यांना पुरावे दिले आहेत. मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,” असे मत राजन साळवी यांनी व्यक्त केले आहे.
“आमच्यासोबत आणि केजरीवालसोबत जे घडले ते नितीश-नायडू यांच्यासोबतही घडू शकते,”
कोण आहेत राजन साळवी?
राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राजकीय वर्तुळामध्ये ओळखले जातात. ते राजापूर विधानसभेचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1993 ते 94 च्या सुमारास ते शिवसेनेत सक्रीय झाले. त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्षपद भूषवलं होतं. राजन साळवींनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुखपदही सांभाळलेले आहे. 2009 च्या निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. मात्र आत्ताच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांकडून राजन साळवींचा पराभव झाला. त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीत विनायक राऊतांनी मदत न केल्याचा आरोप राजन साळवींनी केला आहे. अवैध मालमत्ताप्रकरणी एसबीकडून राजन साळवींच्या घरी छापेमारी करण्यात आली होती.