
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी द्वारली, भाल, नांदिवली, चक्की नाका, मलंग रोड ते १०० फुटी रोड या परीसरात रात्रीच्या सत्रामध्ये चालणाऱ्या कचरा संकलन व्यवस्थेची समक्ष पाहणी केली.
नागरीकांच्या सुविधेसाठी महानगरपालिके मार्फत सर्व प्रभागात रात्रपाळी मध्ये देखील कचरा संकलन करण्यासाठी १४ गाड्या, १४ वाहनचालक व घनकचरा व्यवस्थापन विभागातील ७० कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत रात्री केल्या जाणाऱ्या साफसफाईच्या कामांची पाहणी उपआयुक्त अतुल पाटील यांनी केली.
ड व आय प्रभागाचे सहा. आयुक्त तसेच स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरिक्षक यांना चक्की नाका, मलंग रोड ते १०० फुटी रोड रस्त्यावरील कचरा पडणारी सर्व ठिकाणी निर्मुलन करण्यासाठी नियोजन सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे रात्रीच्या सत्रात कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रस्ते योग्यरितीने साफ करून घेण्याबाबत सुचना दिल्या.
महापालिका परिसर कचरामुक्त करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अन्यथा कामामध्ये कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे निर्देश उपआयुक्त अतुल पाटील यांनी संबंधित प्रभागाचे सहा. आयुक्त यांना दिले. यासमयी आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.