KDMC : रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हा प्रश्न भारतीयांना कायमच भेडसावत असतो. याला अपवाद कल्याण डोंबिवलीकर देखील नाही. डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसर ते घन:श्याम गुप्ते रस्त्यावर खड्डे पडले आहे.त्याचा त्रास नागरीकांसह वाहन चालकांना होत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण आणि सपाटीकरण करावे, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी केडीएमसी आुयक्त अभिनव गोयल यांच्याकडे गुरुवारी केली आहे.
या मागणीची वेळीच दखल दिवाळीपूर्वी खड्डे भरले गेले नाहीत. 18ऑक्टाेबरपासून KDMC प्रशासनाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा धात्रक यांनी प्रशासनाला दिला आहे.रेल्वे स्टेशन ते घनःश्याम गुप्ते चोक या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खड़े पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना, विशेषतः शालेय लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. हा रस्ता डोंबिवली पश्चिमेतील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन नागरिक विविध वाहनांनी प्रवास करतात.
रस्त्यावर खड्डे असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडून नागरीकांना दुखापती होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्याकडे केल्या जातात.या प्रकरणी केडीएमसीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही परिस्थिती लक्षात घेता रस्त्यावरील खड्डे दिवाळीपूर्वी बुजविण्यात यावे रस्त्याचे डांबरीकरण 17ऑक्टोबर करण्यात यावे. अन्यथा नागरीकांच्या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ 18 ऑक्टाेबरपासून स्टेशन परिसरात लाक्षणिक उपोषण केले जाईल. त्या उपोषणात भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रकही सहभागी होणार असल्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.
असाच काहीसा प्रकार काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये देखील पाहायला मिळाला. चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली ते निरबाडे रस्त्याची अक्षरशः चाळण
झाल्याने गावकरी मेटाकुटीला आले. वाहन चालकांची खड्डे चुकवताना होणारी दमछाक आणि जीव मुठीत घेऊन करण्यात येणाऱ्या प्रवासाला वाहनचालक देखील तसेच या मार्गावरील पुलावर देखील हीच परिस्थिती असल्याने वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळ्यानंतर तरी या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त व्हायलाच पाहिजे अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली होती.