
शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांसाठी अकोलेहून अहिल्यानगरकडे लाल वादळाची कूच
मंगळवारी राजूर येथून निघालेला मोर्चा सायंकाळी सुमारे ५.३० वाजता इंदोरी फाटा येथे पोहोचला. आंदोलकांचा रात्रीचा मुक्काम अकोले येथील पोलिस मैदानावर आहे. हा लाँग मार्च अकोले, संगमनेर, लोणी मार्गे सुमारे १४८ किलोमीटर अंतर पायी पार करत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
नाशिक व ठाणे-पालघर येथील लाँग मार्चमध्ये तसेच २०२३ मधील अकोले-लोणी लाँग मार्चमध्ये मान्य झालेल्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
डॉ. अजित नवले यांनी सांगितले, “महिन्याला अवघ्या २,५०० रुपयांवर काम करणारे पोषण आहार कर्मचारी मोठ्या आशेने या मोर्चात सहभागी झाले आहेत. व्यवस्थेने कष्टकऱ्यांच्या माथी मारलेला संघर्ष किती तीव्र आहे, याची ही जाणीव आहे.”
राज्य सरकारकडून मंत्रालयात या संदर्भात बैठक घेण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. संबंधित विभागांचे मंत्री बैठकीत प्रत्येकी २० मिनिटे देणार असल्याचे समजते. मात्र चर्चा सुरू असली तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे किसान सभा व सीटू संघटनांनी स्पष्ट केले आहे.
आता हा लाँग मार्च अहिल्यानगरपर्यंत पोहोचतो की त्याआधीच चर्चेतून तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.