रस्ते लवकरच होणार खड्डेमुक्त! पालिकेकडून मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर
डोंबिवली : रस्त्याच्या दुरावस्थेबाबतची तक्राक ही कायमच असते. परिसरातील नागरिक असो किंवा वाहनचालक रस्त्यावरील खड्ड्यांबाबत प्रशासन कायमच आतापर्यंत मूग गिळून गप्प राहिलेलं आहे. मात्र रस्त्यावरील खड्यांचं वाढलेलं साम्राज्य लक्षात घेत पालिकेनं याबाबत उपाययोजना युद्धपातळीवर सुरु केलं आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कोणताही निधी न वापरता मोठागाव ते रेतीबंदर रोड वरती अस्फाल्ट मास्टिकने खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी रस्त्यावरील खड्डे भरण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाची दखल घेत रस्त्यावरील खड्डे अस्फाल्ट मास्टीक पद्धतीने भरण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. मोठागाव रेती बंदर रोडवर गेल्या काही महिन्यांपासून डीएफसीसीआयएल प्रोजेक्टच्या कामामुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ खड्डे पडले. त्याचा त्रास वाहन चालक, प्रवासी आणि पादचारी यांना सहन करावा लागत होता.
या समस्येबाबत जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी डीएफसीसीआयएलचे ठेकेदार आणि टाटा प्रकल्पाचे ठेकेदार यांच्याकडे वारंवार रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने म्हात्रे यांनी डोंबिवलीतील टाटा प्रोजेक्टचे काम थांबविले. त्याची दखल घेत टाटा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हात्रे यांना भेटायला आले. त्यांनी रस्ता तातडीने दुरुस्त करण्यास मान्यता दिली. आज या रस्त्यावर महानगरपालिकेचा निधी न वापरता काही ठिकाणी अस्फाल्ट मास्टिक टाकण्यात आले आहे. या कामामुळे आता रेती बंदर मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येईल. गणेशोत्सवाच्या काळात हा रस्ता दुरुस्त झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचं मुख्य कारण म्हणजे रस्त्यावरील खड्डे. याचपार्श्वभूमीवर आता गणेश भक्तांना विसर्जनासाठी कोणत्याही त्रासाला सामोरं जावं लागू नये याकरिता, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे यांनी प्रशासनाला याबाबत आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पालिकेने खड्डे बुजवण्याचं सुरु केलं आहे. केडिएमसी हद्दीतील अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मात्र डोंबिवली परिसरात रस्त्यांच्या दुरावस्थेवर पालिकेने सुरु केलेल्या कामावर नागरिकांना दिलासा व्यक्त केला आहे.