विदर्भात पावसाचा आजही अलर्ट; मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा (फोटो सौजन्य-X)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पाऊस होताना दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. असे असताना नागपुरात सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. बुधवारी शहराच्या काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. मात्र, आता नागपुरातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान खात्याने 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः नद्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरात सोमवारी सकाळी 8.30 ते मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत 30.9 मिमी पावसाची नोंद झाली. रात्रीच्या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला. शहराचे कमाल तापमान 30.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
दरम्यान, हवामान विभागाने 8 सप्टेंबरपर्यंत शहराचे हवामान असेच राहील असे संकेत दिले आहेत. 3 ते 5 सप्टेंबरपर्यंत हवामान सामान्यतः ढगाळ राहील. हलका पाऊस किंवा सरी पडण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत दररोज 1-2 हलक्या सरींची शक्यता आहे. या काळात शहराचे कमाल तापमान 30-31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23-24 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले.
राज्यातील अनेक भागांत पावसाची विश्रांती
राज्यभरात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, हवामान विभागाने येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कोकण किनारपट्टी, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्याला पावसाचा अलर्ट दिला आहे. मुंबई आणि उपनगराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.