दीपक गायकवाड, मोखाडा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा ते वाघ्याचीवाडी दरम्यानचा पालघर-वाडा-देवगाव राज्य मार्ग क्र. ३४ सध्या अक्षरशः धोकादायक स्थितीत असून रस्ता आतून खचून पोकळ झालेला आहे. पावसामुळे रस्त्याला मोठं भगदाड पडलं असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ दोन छोटे दगड ठेवून या रस्त्यावर वाहनांची वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे.
या मार्गावरून जाणारे नवखे वाहनचालक विशेषतः अंधारात किंवा पावसात धोका पत्करत आहेत. खड्डे आणि खचलेली जमीन लक्षात न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच याच राज्य मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असून त्यांची देखभाल किंवा दुरुस्ती करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरलेला आहे.
खोडाळा ते वाघ्याचीवाडी या दरम्यानचा रस्ता खचलेला असून त्या ठिकाणी कोणतीही चेतावणी, धोकादर्शक फलक, रिफ्लेक्टिव्ह पट्टे किंवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत. फक्त दोन दगड ठेवून सुरक्षेचा दिखावा करण्यात आलेला आहे. हे ठिकाण पाहून प्रशासनाची बेपर्वाई स्पष्ट होते.
या मार्गावर केबल टाकण्यासाठी खाजगी कंपन्यांनी खोदकाम केले असून, त्याचमुळे रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखालील या रस्त्यांवर खाजगी कंपन्यांनी केलेल्या खोल खड्ड्यांमुळे माती खचली असून, त्यामुळेच अनेक ठिकाणी रस्ते धोकादायक बनले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोखाडा यांनी अद्याप यावर कोणतीही तातडीची उपाययोजना केलेली नाही.
खोडाळा ही मोखाडा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी आणि वाहनांची वर्दळ असते. बाजारपेठेच्या परिसरात जलजीवन मिशनअंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे मुख्य रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. यामुळे वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. संपूर्ण परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत निष्क्रियतेने आणि बेफिकिरीने पाहिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. तातडीने रस्त्यांची दुरुस्ती आणि ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.