मुंबई : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या चौकशीसाठी दिल्ली सीबीआयची (Delhi CBI) टीम मुंबईत दाखल झालेली आहे. केवळ आर्यन खान (Aryan Khan Case) प्रकरणात खंडणी आणि खोटा गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नातच ही चौकशी सुरु नाहीये. तर वानखेडे यांच्या कथित मालमत्तेप्रकरणीही ही चौकशी सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.
एनसीबीकडूनच पहिल्यांदा समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. त्या अहवालावरच आता सीबीआयनं हा गुन्हा दाखल केला आहे. वानखेडे यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी त्यांना कोर्टानं २२ मेपर्यंत संरक्षण दिलं आहे. मात्र, सीबीआय वानखेडेंची चौकशी करताना दिसतेय. एनसीबीच्या अहवालात वानखेडेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
वानखेडेंकडे किती आहे संपत्ती?
एनसीबीच्या व्हिजिलन्स रिपोर्टमध्ये वानखेडे यांच्या मालमत्तेची माहिती देण्यात आलीय.
1. मुंबई आणि नवी मुंबईत वानखेडेंचे 5 फ्लॅट
2. वांद्रे, गोरेगावमध्ये निवासी फ्लॅट
3. नवी मुंबईत एक बार
4. कोट्यवधी रुपयांच्या 2 कर्मशिअल बिल्डिंग्स
5. वाशिम जिल्ह्यात काही एकर जमीन
6. अहवालानुसार वानखेडे आणि पत्नीचं वार्षिक उत्पन्न 45 लाख 61, 460 रुपये आहे.
7. इतक्या उत्पन्नांत एवढी संपत्ती कशी, हा सवाल
8. 2017 ते 2021 या पाच वर्षांत समीर वानखेडे यांचे सहकुटुंब परदेश दौरे यात इंग्लंड, पोर्तुगाल, आयर्लंड, द. अफ्रिका, मालदीवचा समावेश
9. पाच देशात सहकुटुंब 55 दिवसांचा प्रवास
10. या परदेश दौऱ्यासाठी 8 लाख 75 हजार खर्च झाल्या वानखेडेंचा दावा
11. व्हिजिलन्स कमिटीकडून दावा फेटाळला, पाच देशांचा विमान खर्चही जास्त असल्याचं सांगितलं.
12. वानखेडे वापरत असलेल्या महागड्या वस्तूंवरही प्रश्न, महागडे कपडे, घड्याळ, शूज, बेल्ट याचे पैसे आले कुठून हा प्रश्न
13. वानखेडे यांच्याकडे असलेलं घड्याळ 17 लाखांचं, सरकारी अधिकाऱ्याकडं 17 लाखांचं घड्याळ कसं.
उत्पन्नाचा स्रोत काय, यावरुन अडचणी वाढणार
इतकी मोठी संपत्ती समीर वानखेडे यांच्याकडे आली कशी, यावरुन अडचण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. लग्नापूर्वी मुंबईत वानखेडे आणि त्यांच्या पत्नीनं दीड कोटींचाही एक फ्लॅट घेतला होता.
आर्यन खान प्रकरणही भोवणार
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि अरबाज खान या दोन नावांचा समावेश आरोपपत्रात शेवटच्या क्षणी करण्यात आला. असा ठपकाही व्हिजीलन्स कमिटीनं ठेवलाय. या दोघांकडेही फारसे ड्रग्ज मिळाले नसल्याचं सांगण्यात येतंय. ज्यांच्याकडे ड्रग्ज होते, त्यांची नावे वगळण्यात आल्याचाही आक्षेप. ही नावं वगळण्यासाठी काही पैसे घेतले होते का, याची चौकशी करण्याची गरज असल्याचं व्हिजीलन्स कमिटीचं मत असल्याचं सांगण्यात येतंय.
आर्यन खान प्रकरणात शहारुखची मॅनेजर पूजा ददलानी हिनं समीर वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचे आरोप केले होते. किरण गोसावीच्या माध्यमातून पैसे मागितल्याचा पूजा यांनी आरोप केला होता.
मुंबईच्या एनसीबीच्या कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड केल्याचाही आरोप व्हिजीलन्स कमिटीनं ठेवलेला आहे.
आर्यन खानला कोठडीत घेतल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी वानखेडेंकडे केली होती त्यावेळी त्या दिवसांतलं फूटेज करप्ट झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीचा डीडीआर जप्त केला आहे. या सगळ्या अहवालावर समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, सीबीआय या प्रकरणात चौकशी करीत आहे.