
Gokul Dudh Sangh Election, Kolhapur News,
गोकुळची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तशतसी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर गोकुळ दुध संघातील दोन प्रमुख नेत्यांच्या कथित गैरकारभाराचे ‘कच्चे चिठ्ठे’ उघड करणारी मालिका चक्क व्हायरल करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या या युद्धामध्ये गेल्या काही दशकांतील राजकीय घडामोडींवर थेट निशाणा साधला आहे. तब्बल ३५ वर्षे एकत्र राहून कारभार करणारे आणि गेल्या पाच वर्षांत बंड करून महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत घरोबा करणाऱ्या नेत्यांच्या राजकीय प्रवासावर बोचरी टीका केली जात आहे. (Kolhapur Politics)
राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या गटांकडून या दोन प्रमुख नेत्यांनाच लक्ष्य केले जात असून, त्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गोकुळमधील कथित गैरव्यवहार, निर्णय आणि अंतर्गत राजकीय समीकरणांवर आधारित व्हिडिओ, मेसेज आणि पोस्टची मालिकाच सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. “गोकुळ निवडणुकीचा प्रचार यंदा केवळ सभांपुरता मर्यादित न राहता सोशल मीडियावर एकमेकांचे कच्चे चिठ्ठे बाहेर काढण्यापर्यंत पोहोचला आहे.”
राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांची कोंडी करण्यासाठी जे मुद्दे जाहीरपणे मांडले जाऊ शकत नाहीत, ते मुद्दे आता सोशल मीडियाच्या माघ्यमातून पुढे येऊ लागले आहेत. सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, या निवडणुकीत ठराव करणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे प्रत्येक गटाला ठराव करणाऱ्यांची गरज असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय कुरघोडी सुरू असल्याचेदिसत आहे.
Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. या पोस्ट आणि व्हिडीओंमधून संबंधित नेत्यांच्या राजकीय वाटचालीसह गोकुळमधील कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे गोकुळमधील मागील काही वर्षांपासून सुरू असलेला कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या ३५ वर्षांतील गोकुळमधील घडामोडी दूध उत्पादकांसमोर मांडण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत ज्या संचालकांनी काही नेत्यांना सहकार्य केले, त्यांच्यावरही आता थेट जाहीर टीका न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप केले जात असल्याचे दिसून येते.