
कोल्हापूर: कोल्हापूर विमानतळाजवळून उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव कडे जाणारा रस्ता बंद केल्याने नेर्ली व तासगाव (तामगाव) येथील ग्रामस्थांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेत मोर्चा काढून कोल्हापूर विमानतळाकडे जाणारा मार्ग रोखून धरला. महीला, पुरुष संतप्त झाले होते. हा रस्ता बंद केल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांना दहा किलोमीटर फिरून जावे लागत आहे. पर्यायी रस्ता सुरू होत नाही तोपर्यंत सध्याचा रस्ता सुरू करून द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती.
दरम्यान, विमानतळाची सुरक्षा आणि विस्तारीकरण यामुळे हा रस्ता बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील तामगाव ग्रामस्थांनी महिला , पुरुष , शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन विमानतळावर मोर्चा काढला. हातात फलक आणि निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा विमानतळापासून अवघ्या शंभर मिटर अंतरावर आला. तामगाव परिसरातील एक रस्ता विमानतळ प्राधीकरनाने बंद केल्यामुळे तामगावकरांना नऊ ते दहा किलोमीटर फिरून कोल्हापूर मार्गावर यावे लागत आहे. हा रस्ता विमानतळाने पुन्हा सुरू करावा अशी मागणी तामगावकरांनी केलेली आहे.
विमानतळावरच थेट धडक मारली. आंदोलकांनी म्हटलं की, जिल्हाधिकाऱ्यांसोबत यापूर्वी बैठक आयोजित केली होती आणि त्यात रस्त्याचा प्रश्न निकाली काढू असे ठरले होते. मात्र त्यावेळी जिल्हाधिकारी भेटले नाहीत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की आठवड्याभरात यावर तोडगा काढूया. आता दोन आठवडे उलटले तरी काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे प्रशासन दिलेला शब्द पाळला जात नसल्याने आंदोलन हाती घेतल्याचे सांगीतले.
Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
तामगावकडे जाणारा रस्ता सहा महिन्यांपासून बंद असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. उपजिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही रस्ता सुरू न झाल्याने गावकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलकांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, ‘आमचा रस्ता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जुना रस्ता खुला करून द्या.’ मागील वेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.