विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त (फोटो सौजन्य-X)
अलायन्स एअरच्या जुन्या वेळापत्रकानुसार अमरावती-मुंबई उड्डाण संध्याकाळी ४:५० वाजता सुटत होते आणि ६:३५ वाजता मुंबईत पोहोचत होते. मात्र, ऑक्टोबर २०२५ पासून उड्डाणे सकाळच्या वेळेत हलवण्यात आली आहेत. नव्या वेळापत्रकानुसार मुंबई-अमरावती उड्डाण सकाळी ७:०५ वाजता सुटते आणि ८:५० वाजता अमरावतीत उत्तरते. तेथून परतीचे उड्डाण ९:१५ वाजता सुटून ११:०० वाजता मुंबईत पोहोचते. तथापि, सोमवार, १७नोव्हेंबर रोजी मुंबईहून अमरावतीला येणारे विमान तब्बल १ तास ३० मिनिटे उशिरा म्हणजे सकाळी १०:२० वाजता उतरले. परतीचे उड्डाण १०:४५ वाजता निघाले.
उड्डाण विलंबाची कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने विमानतळावर प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. बेलोरा विमानतळ शहरापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. चौकशी केंद्राचा अभाव, कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी अपुरी किंवा चुकीची माहिती यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढत आहे. तीव्र थंडी असूनही प्रवाशांनी तब्बल १ तास ३० मिनिटे विमानाची वाट पाहिली.
कापूस व्यापारी शिवकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या सोबत मुले, महिला, वृद्ध आणि मधुमेही रुग्ण होते. वारंवार होणाऱ्या विलंबामुळे पॅकेज्ड फूड, बिस्किटे, ड्राय स्नॅक्स, चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या वस्तू उपलब्ध नसणे ही मोठी समस्या ठरते. विमानतळावर फक्त आरओचे पिण्याचे पाणी उपलब्ध असून अनेक प्रवासी बाटलीबंद पाणी पसंत करतात, त्यामुळे आरओ पाणी पिण्यास ते कचरतात.
प्रवाशी इंटरनेटवर वेळापत्रक पाहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. तसेच विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी क्रमांक नसल्याने प्रवासापूर्वीची माहिती मिळवणे कठीण होते.
प्रवाशांसाठी विमानतळ प्रशासनाने तातडीने अन्न-पेय, प्रवासी वाहतूक, चौकशी केंद्र, अचूक माहिती व्यवस्था आणि ऑनलाइन वेळापत्रक यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली आहे.
अनेक विमानतळांवर उपलब्ध असणाऱ्या इलेट्रिक कार्ट किंवा बससारख्या सुविधांचा बेलोरा विमानतळावर पूर्णतः अभाव आहे. त्यामुळे रुग्ण व वृद्धांना प्रवेशद्वारापासून विमानापर्यंत चालत जाते लागते. हे अत्यंत गैरसोयीचे असल्याचे प्रवाशांचे मत आहे.






