मुंबई: गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेले माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी निष्ठावान भाजपकडून पक्षाचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांना बाजूला सारत राहुल आवाडेंना उमेदवारी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे हळवणकर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पण आता त्यांची ही नाराजी उघडपणे समोर आली आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत कार्यालय असतानाही हळवणकर यांनी शहरात दुसरे स्वतंत्र कार्यालय सुरू केल आहे. हळवणकरांच्या या भूमिकेमुळे मात्र पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. एकाच शहरात भाजपची दोन कार्यालये कार्यरत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील खरे भाजप कार्यालय नेमके कोणते? आणि राहुल आवाडेंनी अधिकृत पक्ष कार्यालयात पाऊल ठेवले आहे की नाही, हा मुद्दा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे हे नवीन कार्यालय स्थापन करून हळवणकर गटाकडे दुर्लक्ष केल्याचा संदेश जाणीवपूर्वक दिला जात असल्याची प्रतिक्रिया पक्षातील कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
इचलकरंजीत नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजपच्या संपर्क कार्यालयात प्रकाश आवाडे यांनी जिल्ह्यातील कोणत्याही भाजप नेत्याला स्थान दिलेले नाही. नव्या कार्यालयाच्या फलकावर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे – जसे की राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार सुरेश हळवणकर – यांचे ना फोटो आहेत, ना उल्लेख.
हा फलक आणि त्याचे फोटो समाजमाध्यमांवर प्रकाश आवाडे यांनी शेअर केल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले असून चर्चेला नवे चांद लागले आहेत. भाजपच्या स्थापनेच्या दिवशीच माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी हे स्वतंत्र कार्यालय सुरू करून अधिकृत पक्ष कार्यालयाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, इचलकरंजी शहरात आधीच भाजपचे अधिकृत कार्यालय असतानाही हे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे, यामुळे पक्षात गटबाजी आणि नाराजी अधिकच उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे.
इचलकरंजीत नव्याने सुरू झालेल्या भाजपच्या कार्यालयाच्या डिजिटल फलकावरून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना संपूर्णपणे वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत एकत्र आलेले माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा देखील या फलकावर उल्लेख नाही. त्याचप्रमाणे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा फोटोही फलकावर दिसत नाही.
ब्रिटन संतापला! इस्त्रायलने दोन महिला खासदारांना देशात प्रवेश नाकारला; नेमकं कारण काय?
या फलकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील इतर नेत्यांना डावलून केवळ स्वतःचीच राजकीय प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हळवणकर गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपच्या अधिकृत कार्यालयाच्या अस्तित्वात असतानाही हे स्वतंत्र कार्यालय उभारणे, आणि त्यात फक्त काहीच चेहऱ्यांना महत्त्व देणे – यामुळे पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत वाद आणि गटबाजीला खतपाणी मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यात सामंजस्य घडवून आणत ही जागा भाजपकडे आली होती. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करत हळवणकरांनी आवाडेंना मदतीचा हात दिला होता. मात्र आता, त्याच हळवणकरांना आवाडे दुर्लक्षित करत असल्याची चर्चा रंगत आहे. हळवणकरांनी आपल्या भूमिका मागे घेत आणि कार्यकर्त्यांचा विरोध झेलत केलेल्या समर्पणाची आज कुठेच दखल घेतली जात नसल्याने, त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. आवाडे यांनी स्वतंत्रपणे कार्यालय सुरू करत, प्रचार फलकावरून हळवणकरांचा पूर्णपणे उल्लेख वगळल्यामुळे हा संघर्ष अधिकच उघड झाला आहे. भाजपमध्ये अंतर्गत ताणतणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.