'स्थानिक स्वराज्य' साठी मोर्चेबांधणी, इच्छुकांचे देव पाण्यात; नव्याने होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आ. रोहित पाटील मोठया मताधिक्याने विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर माजी खासदार संजय पाटील गटाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. सध्या तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सोबत आहेत. तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी आणि दहा पंचायत समित्यांच्या १२० गणांसाठीच निवडणूक होईल. २०२२ मध्ये झालेली आरक्षण सोडतही रद्द होऊन पुन्हा नव्याने आरक्षण निघण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गट आणि गणाचे आरक्षण पुन्हा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळातगट आणि गणांच्या रचना नव्याने करण्यात आल्या. नव्या रचनेनुसार जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये ८ गट वाढले होते.
कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यांत जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढला होता. नव्या पूनर्रचनेनुसार जिल्हा परिषदेचे गट ६८ तर, पंचायत समितीचे १३६ गण तयार झाले होते. होते. नव्या प्रभाग रचनेनुसार २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या ६८ गटांची आणि पंचायत समितीच्या १३६ गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीवर काही हरकतीही दाखल झाल्या होत्या.मात्र राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आरक्षण सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या.
विधानसभा निवडणुकीत येळावी, मनेराजुरी सावळज व चिंचणी जिल्हा परिषद गटातुन रोहित पाटील यांना मिळालेल्या उल्लेखनीय मतामुळे ‘राष्ट्रवादी’ पवार गटात उत्साहाचे वातावरण आहे. तर माजी खासदार संजय पाटील यांची विधानसभा निवडणुकीत झालेली पीछेहाट त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी चिंतनाचा विषय बनली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विधानसभेला मिळालेले यश अबाधित राखण्याचे आवाहन आ. रोहित पाटील यांच्यासमोर असणार आहे तर माजी खासदार संजय पाटील यांना आपले तालुक्यातील राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी पुन्हा नव्या ताकतीने बांधणी करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ अजित पवार गटाची उमेदवारी घेतलेले माजी खा. संजय पाटील गट सध्या संभ्रमावस्थेत आहे. नुकत्याच भाजपकडून नव्याने केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये माजी खासदार संजय पाटील यांच्या गटाला डावलले गेल्याची चर्चा आहे. तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खा. पाटील यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची भाजपमधील घरवापसीची शक्यता तूर्तास तरी धूसर दिसत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माजी खासदार गट कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आ. रोहित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर ते पूर्णपणे अॅक्शन मोडवर आलेले दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता आ. पाटील यांनी मतदार संघात संपर्क वाढवला आहे. नुकत्याच तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यात आ. रोहित पाटील यांनी आमसभा आयोजित करून तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वच प्रशासकीय विभागांना निर्देश दिले आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात निवडणुका लागतील या आशेवर असणारे स्थानिक नेत्यांनी जनसंपर्क वाढवल्याचे दिसत आहे. आ. पाटील यांच्या मतदार संघातील दौऱ्यात स्थानिक नेत्यांची होत असलेली गर्दी प्रत्येक गावातील स्थानिकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
Sudhakar Badgujar News: सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
२०२२ मध्येच जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर प्रशासक मुदतवाढ देण्यात दिली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसीचे राजकीय आरक्षण आणि बदललेल्या प्रभाग रचनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. अशातच नगरविकास विभागाने काही महिन्यांपूर्वी महापालिकांच्या प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रभाकरदन ही न्याय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.