राज्यात पुन्हा दमदार पाऊस होणार; पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज (फोटो सौजन्य-X)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच उघडीप दिलेला पाऊस आता पुन्हा दमदार बरसताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडेल. तर पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील घाट परिसरात आणि नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने 26 सप्टेंबरच्या दुपारपासून दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाडा भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस आणि ढगाळ आकाश राहू शकते, असा अंदाज आहे. शिवाय, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट प्रदेश, कोल्हापूर घाट प्रदेश, सातारा घाट प्रदेश, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert: पाऊस इतका का पेटलाय? ‘या’ तारखेपासून राज्यात प्रचंड…; शेतकऱ्यांवर मोठे संकट येणार
राज्य कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामान अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्याचा आणि कापणी केलेल्या पिकांना पाऊस आणि जोरदार वाऱ्यापासून वाचवण्यासाठी व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे. अधिकाऱ्यांनी दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट (डोंगराळ) प्रदेशातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे नद्या आणि ओढ्यांना पूर येऊ शकतो.
महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. आतापर्यंत राज्यात ५० लाख हेक्टर शेती आणि उभी पिके नष्ट झाली आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून २२१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून आणखी निधीची विनंती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत, विशेषतः मराठवाडा प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने लाखो एकर पिके नष्ट केली आहेत आणि असंख्य मृत्यू झाले आहेत.
राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी
मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. बीड, मराठवाडा, अहिल्यानगर आणि इतर अनेक जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. ज्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.